खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनीतीकार नेते गमावले आहेत, अशा शब्दांत आपल्या शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

खासदार अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्री. थोरात म्हणाले की, वयाच्या 26 व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख होती.

ते तीन वेळा लोकसभा सदस्य व पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. अनेकवेळा मंत्रिपदाची संधी असताना त्यांनी ती न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव,

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीसाठी मोठे योगदान दिले आहे. कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे.

आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. काँग्रेससाठी अहमद पटेल हे कायम निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज असायचे. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते.

गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या कामानिमित्ताने पटेल यांच्याशी गाठीभेटी व चर्चा होत असत. माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे माझी कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण खा. पटेल यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे मंत्री श्री. थोरात म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment