रेशनकार्ड नाही तर मला बायको मिळवून द्या; युवकाचे तहसिलसमोर अनोखे आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-शासनापर्यंत आपला आवाज पोहचविण्यासाठी व प्रलंबित मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी अनेकांकडून आंदोलनाचा पवित्र हाती घेतला जातो. यामध्ये वेगवेगळे व जरा हटके स्टाईल आंदोलने नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.

असेच एक अनोखे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. बीड तालुक्यात हे अआंदोलन झाले. याचवेळी युवकाला स्वतंत्र रेशनकार्ड हवे होते. मात्र, नियमावर बोट ठेवत प्रशासनाने त्याला एकट्यासाठी रेशनकार्ड देता येत नसल्याचे सांगितले. त्या युवकाचे लग्न झालेले नाही.

त्यामुळे त्याने तहसिलदार कार्यालयासमोर वरात आणून रेशनकार्ड नाही तर मला बायको मिळवून द्या, अशी मागणी करीत आंदोलन केले. अखेर त्याला रेशनकार्ड देण्यात आले. बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिदार कार्यालयासमोर हे अनोखे वरात आंदोलन झाले. वंचित बहुजन आघाडीने त्याला पाठिंबा दिला होता.

पाटोदा येथील अमित आगे या सुशिक्षित बेरोजगार युवकाला एका कामासाठी स्वतंत्र रेशनकार्ड हवे होते. त्याने यासंबंधी रितसर मागणी केली असता, एकट्यासाठी रेशनकार्ड देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचे लग्न झालेले नाही, त्यामुळे कुटुंबातील अन्य नावे कशी दाखवणार.

त्यामुळे प्रशासनाच्या या आडमुठ्या नियमाविरूद्ध अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायको नसल्याने रेशनकार्ड मिळणार नसेल तर आधी बायको मिळवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले.

आगे याच्या लग्नाची काल्पनिक निमंत्रण पत्रिकाही तयार करून व्हायरल करण्यात आली. एखाद्या लग्नाच्या तयारीने यावे असे कार्यकर्ते फेटे बांधून तर स्वत: आगे नवरदेवाप्रमाणे कपडे परिधान करून आला होता. त्याची मिरवणूकही काढण्यात आली. या आंदोलनानंतर प्रशासनाने त्याची लगेच दखल घेत अमित आगे याला हवे असलेले रेशनकार्ड दिले.

यापुढे दुसऱ्या कोणासाठी आम्हाला असे वऱ्हाड घेऊन येण्याची वेळ येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असेही आंदोलनकर्ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment