साईंच्या दरबारी भाविकांची लूट; दर्शनाच्या पासचा काळाबाजार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. मात्र साई संस्थानने नियोजन करताना अनेक त्रुटी राहिल्याने शिर्डीत सशुल्क पासेसच्या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

पासेसचा आता धंदा होऊ लागला आहे. २०० रुपयांचा पास हजारो रुपयांना विकल्याचा प्रकार घडत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान साई संस्थान व पोलीस खात्यासमोर उभे ठाकले आहे.

ऑनलाईन दर्शन व आरती पासेस मिळण्याची सुविधा व सक्ती साई संस्थानने केली असली तरी अनेकवेळा तांत्रिक अडचणीमुळे ही व्यवस्था कोलमडली जाते.

मात्र त्याला पर्यायी व्यवस्था नाही. निशुल्क पासेस घेण्यासाठी भाविकांची दोन ते तीन किलोमीटर रांग गर्दीच्या दिवशी असते. त्यामुळे अनेक भाविक दलाल (एजंट) यांच्या जाळ्यात अडकतात.

दोनशे रुपयांचा पास चक्क पाच ते दहा हजार रुपयांना विकला जातोय. त्यामुळे या पासेसचा धंद्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या असून हे तरुण साई संस्थांनच्या परिसरात गेट नं. १ व बायोमेट्रिक पास काउंटर परिसर,

बसस्टँड, द्वारकामाई, भक्तनिवास, साई आश्रम याठिकाणी फिल्डिंग लावून पासेस घेतात व तेच पास अव्वाच्या सव्वा भावात विकत आहेत. यात काही प्रमाणात सुरक्षारक्षक व पासेस काउंटर वरील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा व मिलीभगत करणीभूत ठरत आहे.

मंदिर परिसरात संस्थान सुरक्षारक्षक व पोलिसांच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या या गंभीर घटनेची तक्रार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे करणार असे प्रतिपादन प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी मांडले.

Leave a Comment