वांबोरी ते देहरे रस्त्याचे ‘भाग्य’ उजळले!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- दोन तालुक्यांना जोडणार्‍या वांबोरी ते देहरे रस्त्याचे ‘भाग्य’ उजळले आहे! वांबोरीतील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदान करत रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मंजूर झाले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, अजूनही रस्त्याच्या डांबरीकरणास मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्याची सत्तरी उलटूनही हा रस्ता अजूनही खस्ता खात आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी गावातील तरुणांनी प्रयत्नांची शिकस्त केली.

मात्र, त्यांच्या पदरी नेहमीच निराशा पडली. नेत्यांचे, अधिकार्‍यांचे उंबरठे झिजवूनही काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी गांधीगिरी करत स्वत:च रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त जाणीवपूर्वक निवडण्यात आला. एकिकडे संपूर्ण देशात गणराज्य दिन साजरा होत असताना वांबोरीतील तरुणाई या रस्त्याची डागडुजी करताना दिसून आली.

अवघ्या दोन किमी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तरुणाईस वर्षांनुवर्षे झगडावे लागत आहे. गावातील सुमारे 30 ते 40 तरुणांनी सकाळी दहाच्या सुमारास श्रमदानासाठी कोळ्याची वाडी येथे गेले. घमेले, फावडे घेऊन तरुणांनी या रस्त्यावरील मोठ-मोठे खड्डे बुजविले.

लोकवर्गणी करून काही ठिकाणी मुरुम टाकला. उखडलेली खडी बाजूला फेकून देण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, गेंड्याची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत.

कोणत्याही अधिकार्‍याने अजूनही रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तातडीने पाऊले उचललेली नाहीत. गावातील बहुतांशी तरुण हे रोजगारासाठी नगर एमआयडीसी येथे जातात. तेथे जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे.

मात्र, दोन ते तीन किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. नगर तालुक्यातील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यासाठी विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांनी पुढाकार घेऊन आपल्या हद्दीतील रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले.

मात्र, राहुरी तालुक्यातील रस्त्याचे काम अद्यापि अपूर्ण आहे. या रस्त्यावरील आता खडीही उखडून गेली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. अगोदरच रोजंदारीवर काम करायचे आणि त्यात दुचाकी वाहनास खर्च करावा लागत असल्याने खिशाला मोठी झळ बसत आहे.

खासदार दिलीप गांधी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आता या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण मार्च महिन्याच्या अगोदर होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे झाल्यास नगर-पुणे-मुंबईला जाणार्‍या वाहनांची या मार्गावरून वर्दळ वाढणार आहे.

Leave a Comment