मी पक्षांतर केले म्हणजे काय गुन्हा केला होता ? – वाकचौरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले : मी पक्षांतर केले म्हणजे काय गुन्हा केला होता का? आताही कोण कोणत्या पक्षात फिरतात हे आपण पाहतोय. या वेळी लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी साईबाबांना सांगून अपक्ष लढण्याची शपथ घेतली आहे.

असे असले तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे व भाजपबरोबरच राहणार आहे. मागच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा उमेदवार असताना व देशात मोदी लाट असतानाही अकोले तालुक्यातून मला सहाशेचे मताधिक्य मिळाले होते, असे वाकचौरे म्हणाले.

माझ्यासमोर १० वर्षे आमदार राहूनही श्रीरामपूर मतदारसंघातील जनतेसाठी काहीही काम न केलेली इयत्ता दुसरी पास, तर दुसरा जनतेला पाच वर्षे न दिसलेला व १३ दिवसांत खासदार झालेला सातवी नापास उमेदवार उभा आहे. 

लोकं अडाणी, अशिक्षित उमेदवार लोकसभेत पाठवणार नाहीत, अशी टीका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदार सदाशिव लाेखंडे, आमदार भाऊसाहेब कांबळेे यांच्यावर केली. 

पंकज लॉन्सवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात वाकचौरे बोलत होते. ते म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून या वेळी मी अपक्ष निवडणूक लढवत आहे. मागच्या वेळी मी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 

मी पक्ष बदलला म्हणून मतदारांनी मला नाकारले. अनेक लोक अनेकदा आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदल करतात. मी मात्र माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी खासदार होण्याचे स्वप्न पाहिले नाही. जनतेच्या हितासाठी मी लोकसभा निवडणूक लढवली होती व लढवणार आहे.

शिवसैनिकांची फसवणूक करणाऱ्या खासदार लोखंडे यांच्या पराभवासाठी जीवाचे रान करत वाकचौरे यांना विजयी करणार आहोत, असे पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे म्हणाले. 

Leave a Comment