आमदार मुरकुटे यांच्या अडचणींत वाढ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेवासे :- विधानसभेच्या नेवासे मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच पक्षाच्या राज्य पातळीवरील एका वरिष्ठ नेत्याने तालुक्यातील शिक्षणसम्राट आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडे चाचपणी केल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि घाडगे यांच्यातील संघर्ष त्यामुळे अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेवासेफाटा येथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबवले जात आहेत.

या शैक्षणिक संकुलामध्ये राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्या काही वर्षांपासून त्यामुळेच साहेबराव घाडगे यांचं वर्चस्व शैक्षणिक क्षेत्रात वाढू लागले आहे. सुरुवातीच्या काळात गडाख समर्थक म्हणून त्यांची ओळख होती, परंतु नंतर गडाख यांच्याशी मतभेद झाल्याने ते त्यांच्यापासून दुरावले होते.

भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशीदेखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यानंतरही साहेबराव घाडगे यांनी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जवळीक वाढवल्याने घाडगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चादेखील सुरू झाली होती.

बाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाख यांच्यातील संघर्ष ऐरणीवर असतानाच दिलीप गांधी यांच्यापाठोपाठ साहेबराव घाडगे यांचे नावदेखील शर्यतीत पुढे येऊ लागल्याने आमदार मुरकुटे यांची चांगलीच राजकीय अडचण होणार आहे.

Leave a Comment