आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवाशाला चांगले दिवस आणले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेवासे :- ‘जय हरी’ असलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बऱ्याच वर्षांनी नेवाशाला चांगले दिवस आणले आहेत. आता आमचे ठरले आहे. भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे जाहीर आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिले.

नागरी सत्काराला उत्तर देताना विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता बर्डे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक नितीन दिनकर, सेनेचे अध्यक्ष नितीन जगताप होते.

आमदार मुरकुटेंबाबत विखेंनी कौतुकाचे उद्गार काढले. पूर्वीचे सरकार असते, तर जास्तीत जास्त ५० लाखांचा निधी मिळाला असता. भाजप शासन व आमदार मुरकुटे यांच्या पाठपुराव्याने नेवासे शहराला तीस कोटींचा निधी मिळाल्याबद्दल विखेंनी त्यांचे अभिनंदन केले.

नेवासे तीर्थक्षेत्रासाठी प्रलंबित असलेल्या प्राधिकरणाचा प्रस्ताव मार्गी लावतांना मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. गोरखे म्हणाले, भूमिपुत्र या नात्याने महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना नेवाशाला देऊ.

सर्वच महामंडळांचे एकत्रीकरण मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याने घराकुलांसह विविध प्रश्न मार्गी लागणार आहेत. मागील सरकारच्या काळाप्रमाणे दलित समाज वंचित राहणार नाही. नगर पंचायतीने जागा दिल्यास सर्वांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.

आमदार मुरकुटे म्हणाले, तालुक्यासाठी सुमारे १०० कोटींचा निधी आणला. मागील ५ वर्षांत प्रस्थापितांनी कुटिल राजकारण करत विकासाला खीळ घालण्याचे काम केले.

ठेकेदाराकडून कमिशन घेतल्याने ज्या पाणी योजनेचे वाटोळे केले, त्याच प्रश्नासाठी प्रस्थापित आंदोलन करत आहेत. कोणतेही काम न करता संकुलाचे श्रेय घेण्यासाठी भूमिपूजन करण्याचा राजकीय खेळ त्यांनी केला.

Leave a Comment