त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मीच दिसतो …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चा केवळ वावड्या असून अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही स्पष्टीकरण आ. संग्राम जगताप यांनी दिले आहे.

सन २०१४ ची विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठीही पक्षाने उमेदवारी दिली. पक्षाने आपणावर वेळोवेळी विश्­वास दाखविलेला असून त्यामुळे पक्ष सोडण्याचा विषयच नाही.

विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे बिनकामाचे लोकच अशा अफवा पसरवत आहेत. त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मीच दिसत असल्याने आपले नाव घेतल्याशिवाय त्यांना करमत नसल्याचा टोलाही आ. जगताप यांनी लगावला आहे. .

आ. संग्राम जगताप यांनी काल बुधवारी (दि.१७) दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी .

नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, गणेश भोसले, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, अविनाश घुले, विनित पाऊलबुध्दे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, सुनिल त्र्यंबके आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले असून येत्या महिनाभरात नगरमधील आयटी पार्क सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आठ कंपन्या शहरात येणार असून जवळपास अडीचशे तरुणांना या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

लवकरच नगरची ओळख आयटी हब म्हणून निर्माण होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. शहरातील नागापूर एमआयडीसीत सन २००० रोजी आयटी पार्क उभारण्यात आलेले आहे. मात्र अद्यापपर्यंत ते तसेच धूळखात पडून होते.

यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक युवक हे नोकरीसाठी पुण्यात स्थलांतरित झालेले आहेत. या भूमिपुत्रांना अशाच पद्धतीने नगरमध्येच नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयटी कंपन्या नगरमध्ये आणण्यासाठी अनेक दिवसांपासून विविध कंपन्यांशी चर्चा सुरु होती.

अनेक कंपन्यांनी नगरमध्ये येण्यास उत्सुकता दर्शविल्यानंतर त्यांना लागणाऱ्या सोयी-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. कंपनीच्या प्रतिनिधींना सदर ठिकाणी भेट देत त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात यश आले आहे.

प्रारंभी ७ ते ८ आयटी कंपन्या येणार आहेत. यामुळे शहराची फक्त ओळखच बदलणार नसून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार असल्याचे आ. जगताप यावेळी म्हणाले.

Leave a Comment