शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- शहराच्या विकासाठी निधी देण्यात यावा, तसेच एमआयडीसीत नवीन कंपन्या उभारण्यात याव्यात या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शहर विकासासाठी निधी व नवीन कंपन्या उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले. नगर शहर हे राज्यात मध्यवर्ती ठिकाणी असूनही शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही.

शासनाचे या शहराकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाल्याने शहर विकासापासून वंचित राहिले. परंतु, आता युतीचे सरकार आहे. त्यामुळे शहर विकास होईल अशी आशा नागरिकांना आहे.

या पार्श्वभूमीवर उपनेते राठोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत शहर विकासासाठी निधी उपलब्ध करावा, तसेच नगर एमआयडीसी येथे नवीन कंपन्यांच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

या उद्योगांच्या माध्यमातून नगर शहरात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर आराखडा तयार करण्यात येईल. नगर शहराच्या विकासासाठी निधी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कंपन्या उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक शाम नळकांडे, भगवान फुलसौंदर, दत्तात्रय नागपुरे, मंदार मुळे, शुभम बेद्रे, निशांत दातीर, किरण बोरुडे उपस्थित होते.

Leave a Comment