हर्षदा काकडे पुन्हा जनशक्‍ती संघटनेकडून निवडणूक रिंगणात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेवगाव – शेवगावच्या राजकीय पटलावर घुलेंपाठोपाठ काकडे यांचे नाव घेण्यात येते. वर्षानुवर्ष घुलेंच्या विरोधात राजकारण करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कोणताही विचार होत नसल्याने सध्या त्या कोणता पक्ष तिकिट देणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी त्यांनी सुरु केली आहे. पण प्रमुख पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास पुन्हा जनशक्‍ती या त्यांच्या हक्‍काच्या संघटनेकडून निवडणूक रिंगणात त्यांना उतरावे लागणार असल्याचे दिसत आहे.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्या काकडे या लोकसभा निवडणुकीत घुलेंबरोबर काम करू लागल्या. या निवडणुकीत त्यांनी विखेंबरोबरही पंगा घेतला. विखेंशी काकडे यांची चांगलीच जवळीक होती. शेवगावमध्ये काकडे यांना वेळोवळी राजकीय ताकद विखेंकडून देण्यात येत असल्याने काकडे यांचे प्रस्त वाढले होते.

परंतु लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे यांना मदत न करता त्यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जावून आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार केला. त्यामुळे काकडे यांच्या या कार्यपद्धतीवर विखे नाराज आहेत.

दुसरीकडे काकडे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करतांना आपलाही प्रचार करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला विधानसभेचा शब्द दिला असून मी उमेदवार असल्याचे जाहीरपणे बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीनंतर मात्र काकडे पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसल्या नाहीत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शब्द दिल्याचा दावा काकडे यांनी केला. पण मग पक्षाने आयोजित केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीकडे त्यांनी का पाठ फिरविली.

राष्ट्रवादीच्या मुलाखतीला त्या आल्या देखील नाही. मग त्यांच्याकडून उमेदवारीचा होत असलेला दावा हा खरा आहे की केवळ दबाव म्हणून उमेदवारीचा स्टॅंट करण्यात आला. याबाबत आता शेवगावमध्ये उलट सुलट चर्चा होत आहे.

भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आता दुरापास्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी केलेली जवळीक देखील फोल ठरली. आज भाजप काय पण राष्ट्रवादी देखील विचारात घेत नसल्याने त्यांची अवस्था दोन घराचा पाहूणा उपाशी अशी झाली आहे. 

Leave a Comment