एमआयडीसीसाठी आ.विजय औटींनी काय केले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर :- एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद होत आहेत. आजूबाजूच्या गावांतील तरुणांच्या हाताला काम नाही. लोकप्रतिनिधी आणि विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आमदार विजय औटी यांनी या भागातील पाणीप्रश्न सोडवून उद्योगधंदे येण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांनी केली.

नगर तालुक्यातील पारनेर मतदारसंघातील खारेकर्जुने, इसळक, निंबळक, नवनागापूर, वडगाव गुप्ता येथे राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेनिमित्त चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या जनसंवाद यात्रेस डॉ. बबनराव डोंगरे, सुदाम सातपुते, लखन डोंगरे, लक्ष्मण गव्हाणे, राजेंद्र ढेपे, संजय चव्हाण, नितीन कोतकर, माधवराव कोतकर, घनश्याम म्हस्के, हरिष कळसे, दादा झावरे, प्रशांत मदने, दत्ता कोतकर, संतोष जाजगे आदी उपस्थित होते.

चौदा दिवसांपासून जनसंवाद यात्रा चालू आहे. लंके म्हणाले, या भागाजवळच एमआयडीसी आहे. मात्र, येथील तरुण बेरोजगार आहे. आठ-आठ दिवस पाणी सुटत नाही. लोकप्रतिनिधींनी १४ वर्षांत एकालाही नोकरी लावली नाही.

वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर शासनाने शिक्के मारल्यामुळे त्यांना जमिनीवर कर्ज काढता येत नाही. जमीन विकताही येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. दोनच महिन्यांत शेतकऱ्यांच्या उतारावरील शासकीय शिक्के काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Comment