कर्जत – जामखेडमध्ये परिवर्तन अटळ जामखेडमध्ये शिवस्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जामखेड :- राज्यामध्ये जलयुक्त शिवार या योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सरकार सांगत आहे, एवढा मोठा निधी खर्च होऊनही राज्यात दुष्काळ कसा याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जामखेड येथे बोलताना केले.

जामखेड येथे शिवस्वराज्य यात्रेचे अतिशय भव्य आणि जोरदार स्वागत करण्यात आले. खर्डा ते जामखेड हा पूर्ण रस्ता या यात्रेमध्ये सहभागी असलेल्या गाड्या व युवकांनी भरला होता. यात्रा जामखेड येथे पोहोचल्यानंतर जामखेडकरांनी फुलांच्या वर्षावात यात्रेचे जोरदार स्वागत केलं.

येथील बाजारतळावर जामखेडच्या इतिहासामध्ये विक्रमी नोंद होईल, अशी सभा या ठिकाणी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवा नेते रोहित पवार जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, काकासाहेब तापकीर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, मधुकर राळेभात, अंकुशराव काकडे, दीपक शिंदे, नितीन धांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित जनसमुदाय युवानेते रोहित पवार यांच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करताना दिसून आला.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “कर्जत जामखेडचा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये रोहित पवार यांच्या बाजूने उभा असलेला दिसून येतो याचे कारण या सर्व तरुणांचे मन विकास अभावी करपून गेले आहे. यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आलेले आहे. कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाऐवजी गुन्हेगारीचा विकास झाल्याचे दिसून येते.

पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टीका करताना श्री कोल्हे म्हणाले, “या पालकमंत्र्यांनी केवळ चेहऱ्याला मेकअप लावून चेहऱ्याचा विकास केला परंतु जनतेचा मात्र विकास झाला नाही. पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, कर्जतचा एसटी डेपो यासह अनेक प्रश्न तसेच आहेत आणि याचे उत्तर त्यांनी जनतेला देण्याची गरज आहे.”

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “पक्षांमध्ये संकट असताना ज्यांना शरद पवार यांनी प्रत्येक वेळी मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद दिले असे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासारखी मंडळी पक्ष सोडून जातात ही खूप मोठी शोकांतिका आहे.

हे जनतेच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी पक्ष सोडून जात आहेत हे सत्य लपून राहू शकत नाही. हे सर्वजण गेल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे यावेळी त्यांनी नोटबंदी, जीएसटी याच्यामुळे देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट आले आहे”

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “यापुढे कर्जत जामखेडचे राजकारण जातीपातीचा व गटातटाचे न होता केवळ विकासाचं राजकारण केले जाणार आहे. या मतदारसंघांमध्ये आता परिवर्तन अटळ आहे.

आताशी आपली लढाई सुरू झाली असून परिवर्तन करूनच ही लढाई थांबणार आहे. खऱ्या अर्थाने यापुढे या मतदारसंघात विकासाचा सूर्योदय होणार आहे. यावेळी नानासाहेब निकत, गुलाब तनपुरे, दत्तात्रय वारे यांच्यासह रूपाली चाकणकर यांची भाषणे झाली. राजेंद्र कोठारी यांनी आभार मानले.

Leave a Comment