आझाद ठुबे व सहकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- अपहारप्रकरणी कान्हूर पठारच्या तत्कालीन सरपंच, जि. प. सदस्य उज्ज्वला ठुबे यांचे पती माजी जि. प. सदस्य आझाद प्रभाकर ठुबे, विद्यमान सरपंच अलंकार अहिलाजी काकडे, माजी सरपंच कलम लक्ष्मण शेळके यांच्यासह पाच ग्रामसेवकांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहितार्थ याचिकेत कान्हूर पठार ग्रामपंचायतीमध्ये १९९९ ते २०१२ या कालावधीत स्थानिक लेखापरीक्षणात एकूण ३४३ स्थानिक निधीच्या लेखापरीक्षणात आक्षेप घेण्यात आले. ३१० लेखा शकांची पूर्तता झाली.

उर्वरित ३३ लेखापरीक्षण शंकांची पूर्तता झाली नसून एकूण ६४ लाख ५० हजार १८२ रुपयांचा अपहार सिद्ध होत असल्याचे विस्तार अधिकारी रवींद्र आबासाहेब माळी यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात नमूद करण्यात आले आहे.

या अपहारास तत्कालीन सरपंच कमल लक्ष्मण शेळके, आझाद प्रभाकर ठुबे, विद्यमान सरपंच अलंकार अहिलाजी काकडे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी के. एस. सोनवणे, एन. के. शिंदे, एस. बी. नरसाळे, के. एन. भगत, विद्यमान ग्रामविकास अधिकारी बी. पी. काळापहाड हे जबाबदार आहेत.

स्थानिक लेेखापरीक्षणामध्ये पूर्तता झालेल्या २१० लेखापरीक्षण शंकांमध्ये संबंधितांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमध्ये ६ लाख २८ हजार ५६३ रुपयांचा भरणा केला आहे. कमल शेळके, आझाद ठुबे, अलंकार काकडे यांच्यासह

ग्रामविकास अधिकारी के. एस. सोनवणे, एन. के. शिंदे, एस. बी. नरसाळे, के. एन. भगत व बी. पी. काळापहाड यांनी ग्रामविकास निधीमध्ये अपहाराची रक्कम जमा केल्याने संबंधितांवर ठेवलेले दोषारोपपत्र त्यांना मान्य असून अपहार झाल्याची ती एक प्रकारे कबुलीच आहे.

उर्वरित रक्कम ६४ लाख ५० हजार १८२ बाबत पूर्तता न झाल्याने सर्वांविरोधात आपली फिर्याद असल्याचे माळी यांनी नमूद केेले आहे. खंडपीठाच्या आदेशानंतर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी जी. के. धुमाळ यांच्यावर २ लाख ६१ हजार ९३४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ४ जून २०१८ रोजी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा दाखल करताना कमल शेळके यांनी न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्यास स्थगिती मिळवली होती. २८ मार्च २०१९ रोजी न्यायालयाने ही स्थगिती उठवल्यानंतर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल झाले.

Leave a Comment