दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्या ३० सप्टेंबरपर्यंत सुरू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्य शासनाने दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्या ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात सध्या १,५८३ चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण सुमारे साडेदहा लाखांहून अधिक जनावरे आहेत. छावण्यांमधील मोठ्या जनावरांना प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांना ५० रुपये अनुदान दिले जाते.

चारा छावण्यांना आतापर्यंत ३९२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. पावसाळा संपत आला तरीदेखील मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न अजूनही कायम आहे.

या दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मान्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे.

तसेच अद्यापही मराठवाडा आणि इतर दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने यापूर्वी १ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर ३० ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, अद्यापही राज्याच्या काही भागांत मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढवण्याची मागणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

त्यातच ३१ ऑगस्ट रोजी चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे.

Leave a Comment