धनादेश न वटल्याने महिलेला दोन महिने शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : हातउसने घेतलेला एक लाखाचा धनादेश न वटल्याप्रकरणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी भाविशा गाटे यांनी कांचन गोरख चंदन (रा.साई नगर, बोल्हेगाव) या महिलेस दोन महिने साधी कैद व आरोपीने फिर्यादीला दीड लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

या खटल्याची माहिती अशी की,फिर्यादी आशा सुनील जाधव (रा. नेप्तीनाका, नालेगाव) यांच्याकडून कांचन चंदन (रा.साईनगर, बोल्हेगाव) हिने दि.१७ जुलै २०१७ रोजी एक लाख रुपये हात उसने घेतले होते. त्यापोटी आरोपीने फिर्यादीला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन दिली होती.

हि रक्कम सात महिन्याच्या आत फिर्यादीला परत करण्याचा वायदा आरोपीने दिला होता. सात महिन्याची मुदत संपल्यानंतर फिर्यादीने आरोपीकडे हातउसने घेतलेली रक्कम परत करण्यासाठी तगादा केला असता आरोपीने युनायटेड बँक ऑफ इंडिया शाखेचा धनादेश दिला.

हा धनादेश फिर्यादीने स्टेट बँकेच्या दिल्लीगेट शाखेत भरला असता हा धनादेश परत आला. दरम्यान, फिर्यादी आशा जाधव यांनी न्यायालयात दावा दाखल केला. या खटल्याची गुणदोषावर चौकशी करुन न्यायालयाने आरोपी कांचन चंदन हिला दोन महिने साधी कैद व आरोपीने फिर्यादीला दीड लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

तसेच निकालापासून दोन महिन्याच्या आत आरोपीने फिर्यादीला नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीला आणखी एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात नोटरी पब्लिक आर. आर. पिल्ले यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

Leave a Comment