आदिवासींच्या आरोग्यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आदिवासींच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स, संशोधक, अभ्यासक आणि वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव माननीय दीपक खांडेकर यांनी केलं आहे.

आगामी काळात आपण सहकार्याने आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत सुसंवादाचे पूल बांधू आणि आपल्या आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि केंद्र सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चा आज भंडारदरा येथे समारोप झाला.

त्यावेळी ते बोलत होते. विकासाचा प्रवाह आणि आदिवासी जनता यांच्यादरम्यान संवादाची कमतरता असल्यामुळे आधुनिक आरोग्य सुविधा आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवणं हे आव्हानात्मक काम आहे. दोहोंच्या भाषा, जीवनशैली, संवादाची पद्धत यामध्ये खूप फरक असून त्यांच्या मनात याविषयी असलेल्या भीतीमुळे, संकोचामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.

मदतीचा हात पोहोचवत असतानाही आदिवासी जनतेकडून फारशा सकारात्मक प्रतिक्रिया मिळत नाहीत. कारण आरोग्य – शिक्षण या बाबी आजही त्यांच्या प्राधान्यक्रमावर नसल्यामुळे आपण करत असलेले कार्य त्यांना अनावश्यक वाटू लागतं. या समाजाला प्रामुख्याने सुसंवाद आणि त्याद्वारे जनजागृतीची आवश्यकता आहे.

आदिवासी भागांमध्ये आरोग्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आपण सक्षम आहोत; मात्र सुसंवादाचा अभाव आहे. मागील २० वर्षांमध्ये आदिवासींच्या परिस्थितीत परिणामकारक सुधारणा घडत आहेत.

बालमृत्यू, मातामृत्यू दरामध्ये घट झाल्यामुळे आदिवासी लोकसंख्येत अंशात्मक वाढ झाल्याचे दिसून आलंय. पन्नास वर्षांपूर्वी लोकसंख्येच्या ७.५ टक्के असलेले आदिवासी २०११ च्या जनगणनेनुसार ८.६ टक्के आहेत. २०२१ च्या जनगणनेत यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांच्या प्रयत्नांमधून आता वैद्यकीय सुविधा काही प्रमाणात आदिवासींपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. आदिवासी जमातींच्या कल्याणासाठी अशा सुविधांचे राष्ट्रीय पातळीवर बळकटीकरण गरजेचे आहे. शहरी भागात राहून या समस्यांचे गांभीर्य जाणवत नाही.

या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची आवश्यकता असून केवळ शासन या कामी पुरे पडणार नाही तर शासनाला झोकून देऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तसेच लोकांच्या खंबीर आधाराची आवश्यकता आहे असं खांडेकर यावेळी म्हणाले.

प्रवरा ट्रस्ट अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातील आदिवासी क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. समारोप समारंभापूर्वी त्यांनी मवेशी गावातील आश्रम शाळा संकुल आणि माणिक ओझर या गावांना भेट दिली.

माणिक ओझर येथे प्रवरा ट्रस्टच्या माध्यमातून पुरवण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी पाहणी केली. मोटर बाईक ऍम्ब्युलन्स हा अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम असून अन्य दुर्गम आदिवासीबहुल क्षेत्रात अशा मोटर बाईक ऍम्ब्युलन्स पुरवता येतील असं ते म्हणाले.

आशा आरोग्य सेविकेच्या कामांची विचारपूस यावेळी केली. त्यानंतर त्यांनी मवेशी आश्रम शाळा संकुल येथे ‘मिशन पोषण’ या भित्तिचित्र मालिकेचे उद्घाटन केले. कुपोषण निर्मुलनासाठी च्या कार्यास त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करून पाहणी केली. अत्यंत वेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती याठिकाणी अनुभवून आपण भारावून गेलो आहोत, अशा भावना खांडेकर यांनी व्यक्त केल्या.

पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या रान भाज्या तसेच मिलेट वर्गातील धान्ये , त्यापासून तयार केलेले विविध पदार्थ यांचं योग्य दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांनी या बाबींची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.

शहरी भागात आपल्या देशातील या खऱ्या खाद्यसंस्कृती व परंपरांबाबत अनभिज्ञता दिसून येते. अशा पदार्थांचे , आदिवासींनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंचे, नैसर्गिक औषधींचे योग्यप्रकारे विपणन केल्यास आदिवासी मनुष्यबळाला रोजगार मिळू शकेल व त्यांची वाटचाल विकासाच्या प्रती होऊ शकेल असा विश्वास वाटतो असं खांडेकर म्हणाले.

त्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले. खांडेकर यांनी प्रवरा ट्रस्ट संचालित भंडारदरा आदिवासी आरोग्य व संशोधन केंद्रात सुरु केलेल्या नवजात बालक उपचार केंद्र, डिजिटल क्ष किरण विभाग, दंत विभागाचे उद्घाटन केले.

या केंद्रात अद्ययावत रक्ततपासणी यंत्राचे ही उद्घाटन करण्यात आले. ट्रायबेकॉन या संशोधन परिषदेत तीन दिवसात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेचा केवळ संस्थांनाच नव्हे तर आदिवासी विकास मंत्रालयालाही फायदा होणार असल्याचं ते म्हणाले. या क्षेत्रात कार्य करण्यासाठी शासन नेहमीच उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितलं.

प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता भासल्यास शासन अभ्यास,संशोधक, बिगर शासकीय संस्था, वैद्यकीय संस्था यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आगामी काळात आपण आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत सुसंवादाचे पूल बांधू आणि आपल्या आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या उपचार पद्धती त्यांच्यावर लादण्याऐवजी सर्वात आधी त्यांच्या पारंपरिक पद्धती जाणून घेऊन काम सुरू केलं पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने शासकीय मदतीशिवाय आदिवासीबहुल क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने केलेलं कार्य वाखाणण्याजोगे असून आगामी काळात शासकीय सहभागातून आणखी प्रभावीपणे योजना राबवूया असा विश्वास त्यांनी उपस्थितांना यावेळी दिला.

Leave a Comment