घुले बंधूंची भूमिका गुलदस्त्यात!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पक्षांतर्गत विरोधातील गटाने दि.३० रोजी भाजप व मित्र पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे आयोजित केला आहे.

या मेळाव्यात काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना भाजपची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यापूर्वीही वरील कार्यकर्त्यांनी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन केली होती.

मात्र, भाजपची उमेदवारी आमदार मोनिका राजळे यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यामुळे आ. राजळे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी आता नेमकी काय भूमिका घ्यायची, यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

आ.राजळे यांच्यापासून दुरावलेले हे कार्यकर्ते त्यांच्यापैकी एकास उमेदवारी करायला सांगून इतर त्या उमेदवारास पाठिंबा देतील काय? किंवा आ. राजळे यांच्या विरोधात असलेल्या सक्षम उमेदवाराचा प्रचार करणार, की ना. पंकजा मुंडे, ना.राधाकृष्ण विखे यांनी समजूत काढल्यावर पुन्हा आ. राजळे यांच्या प्रचारात सक्रिय होतील, याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे.

या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले तसेच शेवगाव तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थाांवर निर्विवाद वर्चस्व असलेले माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले बंधू निवडणुकीची रणधुमाळी ऐन भरात आलेली असताना अद्याप शांत असल्याने त्यांच्या घरातील कुणालाही राष्ट्रवादीची उमेदवारी करायची नसावी, असा कयास असून, त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत.

ऐनवेळी अपक्ष म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरतात, की एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देतात, यावर बरीच गणिते अवलंबून असून, त्यांनी उमेदवारी केली नाही तरी त्यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक राहणार आहे.

Leave a Comment