मुळाचे पाणी बीडला देण्याच्या हालचाली…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी शहर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक­ऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नसतानाच आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, येथील शेती, उद्योग आणि व्यवसायास पूरक असलेले आपले हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत बीडला देऊ नये, यासाठी प्रसाद शुगर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. दोन दिवसात कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करण्यासाठी तशी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार असल्याने शेतक­ऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे, अशी माहिती प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी दिली.

राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेतक­ऱ्यांना मुळा धरण हे संजीवनी देणारे ठरलेले आहे. मात्र, समन्यायी पाणीवाटप कायद्याद्वारे मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला द्यावे लागले आहे. आता बीडला पाणी देण्याचा कट शिजला जात आहे. मुळा धरणातून बीडला पाणी नेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून मुळा धरण ते बीड या प्रस्तावित वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. हा प्रस्ताव मुंबई येथील संबंधित विभागाकडे विचाराधीन असल्याचीही माहिती मिळत आहे.

याबाबत कुणकुण लागताच राहुरीतील शेतकरी संतापाने पेटून उठला आहे. मुळा धरणात जमिनी आमच्या, धरणासाठी त्याग आमचा आणि पाणी मराठवाडा अन् बीडला. अगोदर जायकवाडी आणि आता बीडला पाणी गेले, तर या विचारानेच डोळ्यांसमोर मरण दिसू लागलेला शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतक­ऱ्यांच्या भावना लक्षात घेता प्रसाद शुगर कारखान्यानेही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणत्याही परिस्थितीत शेतक­ऱ्यांना उद्ध्वस्त करणारी ही बीडची योजना होऊ द्यायची नाही, अशीच खूणगाठ मनाशी बांधली आहे.

Leave a Comment