कामगारांनी दिला वाकळे यांना कष्टाच्या पैश्यातून निवडणुक निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुका म्हंटले की अमाप खर्च. हा खर्च पेळविण्यासाठी नगर शहर विधानसभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्यासाठी एमआयडीसी मधील कामगारांनी आपल्या कष्टाचे 10 हजार रुपये निवडणुक निधी म्हणून दिला. सर्वसामान्य नागरिक व कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे वाकळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एमआयडीसीतील क्लासिक व्हिल कामगार संघटना, सिटू संलग्नच्या कामगारांनी सदर निधी भाकपचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांच्याकडे सुपुर्द केला. सर्वसामान्य कामगारांसाठी लढणारे व त्यांना न्याय मिळवून देणारे वाकळे या निवडणुकीत विजयी होऊन शहराचा विकास साधणार असल्याचा विश्‍वास कामगारांनी व्यक्त केला.

यावेळी विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली, राज्य सहसचिव अ‍ॅड.सुभाष लांडे, बापूराव राशीनकर, कॉ.महेबुब सय्यद, कॉ.रामदास वाघस्कर, महादेव पालवे, अंबादास दौंड, अ‍ॅड.सुधीर टोकेकर आदी उपस्थित होते.

भालचंद्र कांगो म्हणाले की, भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे चळवळीतून आलेले सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाची जाणीव असून, सर्वसामान्य वर्ग त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

वाकळे यांना सर्वसामान्य नागरिक व कामगारांमध्ये मिळणारे प्रेम यातून व्यक्त होत असल्याचे कॉ.शंकर न्यालपेल्ली म्हणाले. बहिरनाथ वाकळे यांनी सर्वसामान्य जनतेने निवडणुक हातात घेतली असून, धनशक्ती विरुध्द जनशक्तीचा लढा असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment