विखेंच सर्जिकल स्टाईक सुरूच, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार मोहरे गळाला लावले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यातील तरूणवर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भाजपा – सेनेने सुरू केलेली राजकीय मेगाभरती मात्र अजुनही कायम आहे. चालू आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीचे चार मोहरे युतीने गळाला लावले.

दरम्यान, विखेंचे जिल्ह्यात सर्जिकल स्टाईक सुरू असले तरी, अगोदरच हाऊसफुल्ल झालेले भाजप आताच्या जोरदार इनकमिंगमुळे आणखी तुडूंब भरले गेले असून त्यात निष्ठावंतांची दमछाक सुरू असल्याचेही वास्तव चित्र आहे. लोकसभेला ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला नगरची जागा सोडण्यास विरोध केल्यापासून विखे राष्ट्रवादीवर प्रचंड संतापले आहेत.

या रागातच त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तेव्हापासून जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या मुळावर उठलेले हे विखे पिता – पुत्रांनी जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण चांगलेच रंगवले आहे. यापुर्वी विद्यमान आमदारांना गळाला लावल्यानंतर आता दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही भाजपाने लक्ष्य केले आहेत.

चालू आठवड्यातच पारनेरचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा जि. प. माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी विखेंच्या उपस्थितीत अन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार ना. विजय औटी यांना लढत सोपी झाली आहे. झावरे हे एकेकाळी राष्ट्रवादीचे निष्ठावंत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून निलेश लंके हे राष्ट्रवादीत आले आणि विधानसभेसाठी त्यांनी मोठा धसका घेतला होता. ते खरेच झाले. विधानसभेला झावरेंना डावलून लंकेंना संधी देण्यात आल्याने ते नाराज होते. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांच्या घरात जि. प. उपाध्यक्षपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे.

श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे राजेंद्र नागवडे यांनाही भाजपात आणण्यात विखेंनी यश मिळवले आहे. वास्तविकतः नागवडे हे काँग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात यांना मानणारे आहेत. लोकसभेसाठी नगर दक्षिणमधून अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांना थांबविण्यात आले होते. तसेच विधानसभेसाठीही पाच वर्षापुर्वी नागवडेंच्या नावावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले होत. मात्र आ. राहुल जगताप हे थांबण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे नागवडेंची नाराजी विखेंनी ओळखली होती. ही संधी साधून विखेंनी नागवडेंना जि. प. अध्यक्षपदाचा शब्द देवून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात आणून श्रीगोंद्याची लढाई जिंकली.

नगर शहरातही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यातील वितुष्ठ डॉ. विखेंनी ओळखले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी कळमकर यांचा सेनेत प्रवेश घडवून आणला. खरंतर, कळमकर यांना नगर शहरातून राष्ट्रवादीची विधानसभेची उमेदवारी हवी होती. माजी आ. दादाभाऊ कळमकर यांनी अभिषेकसाठी शरद पवार यांच्याकडे शब्द खर्ची केला होता. मात्र, आ. जगताप हे लोकसभेला पराभूत झाले असल्याने त्यांना सहानुभुती मिळेल, या अंदाजाने पुन्हा कळमकर यांना डावलून जगताप यांना पुढे करण्यात आले. त्यामुळे कळमकर हे नाराज होते. त्यातून त्यांनी सेनेचा मार्ग पकडला असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

आता, नेवासा विधानसभा मतदार संघातही विखेंनी आपली जादू टाकली आहे. तेथे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक तथा माजी जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा ना. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घडवून आणला आहे. लंघे हे पुर्वाश्रमीचे भाजपाचेचं पण त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले होते. आता ते घुले समर्थक समजले जात असताना ते अचानक राष्ट्रवादीला सोडून भाजपात गेल्याने मुरकुटेंना गुदगुदल्या तर गडाख मात्र हवालदिल झाले आहेत. आता लंघे हे कुणाच्या सांगण्यावरून भाजपात गेले किंवा राष्ट्रवादीत राहून मुरकुटेंना मदत करणे शक्य नसल्याने त्यांना भाजपात पाठविण्यात आले, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत.

त्यातून घुले – गडाख वाद शमला असल्यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच मतदार संघात भाजपा – सेनेतील प्रवेश जोरात सुरू आहेत. त्यात पारनेर, श्रीगोंदा, नगर आणि नेवासा मतदार संघातील हे चार प्रवेश निकाल बदलविणारी ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे .

Leave a Comment