..तर शिवसेना सरकार स्थापन करेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. हीच ती वेळ आहे.

आता नाही तर कधीच नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा लोकशाही मानणाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही. राष्ट्रपती कोणाच्या खिशात नसतात, असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ईडी, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण आता कोणत्याही पक्षातील आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून यांनी फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. अशाच राजकारणामुळे राज्यातील जनतेने बंड केले.

राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या हे त्याचेच फलित आहे. शरद पवारांच्या बाबतीत ईडीचे प्रकरण घडायला नको होते, असेही ते म्हणाले. लोकसभेला युतीचा फॉर्म्युला ठरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले होते की विधानसभेला फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याने लढू.

निवडणुकांनंतर पद आणि जबाबदाऱ्यांचे वाटप समसमान होईल. याचाच अर्थ मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे द्यायचे असा होतो, असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment