रोहित पवार म्हणतात तर संसार नीट कसा होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं होत असतील तर संसार नीट कसा होणार, असा टोलाही रोहित पवारांनी शिवसेना-भाजपला लगावला.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला , आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्यामनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देवून देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का ?

राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला , आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे.

या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का ? यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे , त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?

Leave a Comment