महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्या पूर्वी नगर मनपावर प्रशासक नेमावा – किरण काळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर : शहरातील खड्ड्यांमध्ये हरवलेले रस्ते, जागोजागी साचलेला कचरा आणि आरोग्य या तीन विषयांमुळे सध्या नगरकर नागरिक हैराण झालेले आहेत. महानगरपालिकेतील नेते आणि अधिकारी यांनी पाऊस थांबला की लागलीच कामाला सुरुवात करू अशा वल्गना केल्या होत्या.

मात्र प्रत्यक्ष कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी राजकीय अस्थिरता मुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यापूर्वी नगर मनपावर प्रशासक नियुक्त करण्यासाठी आपल्या अधिकारांचा उपयोग करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण काळे यांनी केली आहे.

काळे यांनी ई-मेलद्वारे राज्यपालांना निवेदन पाठविले आहे. त्यामध्ये काळे यांनी म्हटले आहे की नगर शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शहरात असा एक ही रस्ता नाही की ज्या रस्त्यावरती खड्डे नाहीत.

यात काही जणांनी आपला जीव देखील गमावला आहे. रोज होणाऱ्या अपघातांमुळे अनेक नागरिक जखमी होत आहेत. एकूणच नगरकर नागरिकांचे यामुळे मानसिक आरोग्य देखील खराब झाले आहे.

वंचित आघाडीने सर्वात पहिले म्हणजे २५ ऑक्टोबर ला या संदर्भात आवाज उठवीत प्रशासनाला निवेदन देत जाब विचारला होता. यानंतर लोकप्रतिनिधी यांनी तातडीने पुढाकार घेत अधिकाऱ्यांना काम सुरु करण्याचे आदेश दिले होते.

मात्र त्या आदेशांना अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. मुळात पडद्या आड अधिकारी – पदाधिकारी मिलीभगत असल्यामुळेच शहराची ही दुर्दशा झाली असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

अनेक संघटनांनी, पक्षांनी आंदोलने केली आहेत. तरीसुद्धा शहरातील नेते, मनपातील पदाधिकारी, अधिकारी यांना मनाची नाही तर किमान जनाची सुद्धा लाज वाटायला तयार नाही. गेंड्याच्या कातडीच्या या प्रवृत्तींना चाप बसविण्यासाठी आणि शहराचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनीच या विषयात लक्ष घालून तात्काळ अहमदनगर महानगरपालिका प्रशासक नेमावा अशी मागणी किरण काळे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

शहरात सध्या प्रशासकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री, मंत्री हे सत्ता संपादनाच्या मागे धावण्यात व्यस्त आहेत. यामुळेच आपण थेट राज्यपालांच्या दरबारात हा प्रश्न उपस्थित केल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

नगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे. महानगरपालिकेत भाजप राष्ट्रवादीची सत्ता येऊन एक वर्ष लोटलं. भाजपने दिलेले तीनशे कोटींचे आश्वासन देखील पूर्ण केले नाही.

शहराची दैना झालेली आहे. राष्ट्रवादीने जर खरोखर विकासाच्या मुद्द्यावरती भाजपला पाठिंबा दिला होता तर तो आता विकास होत नाही या मुद्द्यावर तात्काळ काढून घेत जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची हिम्मत दाखवावी, असं आवाहन किरण काळे यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.

Leave a Comment