पोलिस निरीक्षकास माहिती आयोगाची २५ हजार रुपये दंडाची नोटीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :-  माहिती अधिकारांतर्गत अर्जदारास वेळेत माहिती दिली नाही, या कारणावरुन शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना माहिती आयोगाने २५ हजारांंचा दंड का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने निरीक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजिज शेख यांनी २०१५ मध्ये मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या एका दैनिकातील लेखासंदर्भात कारवाईची मागणी तक्रारअर्जाद्वारे पोलिसांकडे केली होती. मात्र, निरीक्षकांनी कारवाई केली नाही. शेख यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत कारवाईची विचारणा केली होती.

मात्र, त्यांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे अपिलीय अधिकारी असलेल्या श्रीरामपूरच्या अतिरिक्त अधीक्षकांकडे अपील केले. तेथे सुनावणीदरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी १५ दिवसांत तक्रारदाराला माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील एफआरची प्रत नोंदणीकृत डाकेने तक्रारदाराला मिळाली नाही.

अपिलात आदेश मिळूनदेखील निरीक्षकांनी माहिती न दिल्याने शेख यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केले होते. त्यावर गेल्या महिन्यात राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाचे माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान अपिलीय माहिती अधिकाऱ्यांनी आदेश देऊनदेखील तक्रारदाराला माहिती देण्यात आली नसल्याचे खंडपीठाला आढळले.

त्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला हेतूपुरस्पर माहिती पुरवण्यास टाळाटाळ केल्याचे अनुमान आयोगाने काढत संबंधित अधिकाऱ्यावर शास्तीची कारवाई का करु नये, अशी विचारणा एका आदेशाद्वारे केली आहे. याबाबतचा लेखी खुलासा आयोगाकडे सादर करण्याचे आदेश संबंधितास देण्यात आले असून माहिती पुरवण्यास टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होत असल्याने २५ हजारांच्या शास्तीच्या कार्यवाहीबद्दल विचारणा केली.

तक्रारदारास माहिती देण्यास टाळाटाळ करणे अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे असून त्यांना आता आयोगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, अशी चर्चा संगमनेर शहरात सुरू आहे.

Leave a Comment