बालदिनीच नवजात बाळाला सोडून आईचे पलायन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
सिन्नर –  सिन्नर बालदिनीच १५ दिवसांच्या नवजात पुरुष जातीच्या अर्भकास घोरवड घाटात सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. 
सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात रस्त्यालगत गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या हे बालक आढळून आले आहे. घोरवड येथील एका आदिवासी समाजाच्या महिलेस हे बाळ सापडल्यानंतर तिने त्यास घरी नेऊन न्हाऊ घालून माणुसकीचे दर्शन घडवले.
घोरवड येथील मथुरा काळू माळी (५०) ही महिला सकाळी शेतात पिकाची सोंगणी करण्यासाठी जात असताना तिला घोरवड घाटात रस्त्यालगत बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मथुरा पहिल्यांदा घाबरल्या. नंतर धीर धरून जवळ जाऊन त्यांनी पाहिले असता तेथे कपड्यात गुंडाळेले बालक असल्याचे आढळून आले.
आजूबाजूला कुणीही नव्हते. भल्या सकाळी हे बाळ या जंगलात रस्त्याच्या कडेला एकटेच पडून होते. माळी त्यांनी त्यास कवेत उचलून घेत आपल्या घरी आणत न्हाऊ घातले. गाईचे दूध पाजून त्याची भूकही क्षमविली. दरम्यान, गावाचे सरपंच रमेश हगवणे यांच्यासह पोलिस पाटलांनी त्यांनी या बाळाबाबत माहिती दिली.
त्यानंतर माळी यांनी हे बाळ सिन्नर पोलिसांच्या स्वाधीन केले. बाळाची सिन्नर नगरपालिका रुग्णालयात तपासणी केल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक येथील बाल सुधारगृहात करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सिन्नर पोलिसांत अज्ञात मातेने नवजात अर्भक बेवारस स्थितीत टाकून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment