जेवणातून कांदा -लसूण हद्दपार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परतीच्या पावसाचा फटका फळबागांबरोबरच भाजीपाल्यालाही बसला आहे. जास्त पाण्यामुळे भाजीपाला खराब होत असल्याने त्याचे दर गगनाला भिडले आहेत. भाववाढीचे कारण भाजीपाला विक्रेत्यांना विचारले असता, जादा पावसामुळे उत्पादन घटल्याने बाज़ारात आवक कमी होत असून, मागणी जैसे थे असल्याने भाजीपाल्याचे दर वधारले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गोरगरीब व सर्वसामान्यांना भाजीपाला घेणे त्यांच्या खिशाला परवडनासे झाले आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे आठवडा बाजारात गृहिणी खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. त्यांचे किचनचे बजेट बिघडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

 

परतीच्या पावसामुळे इतर पिकांबरोबरच भाजीपाल्याचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे. जेवणाला चव आणणाऱ्या कांद्याची पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो विक्री होत असून, लाल मिरची, लसूण दोनशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

 

लसूण व कांद्याचे भाव वाढत्याने गृहिणींची फोडणीला तडका देताना दमछाक होत आहे. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यपणे इतर वेळी कांद्याचे दर पाच ते दहा रुपये किलो असतो. परंतू आता मात्र कांद्याने थेट ५० ते ६० रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

 

हिरवी मिरची व बटाटयाचे भाव सोडले तर सर्वच भाजीपाल्याने अर्धशतक पार केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला आहे ते फायद्यात राहिले असून, त्यांच्या कांद्याला सोन्याचा भाव आला आहे. तर ज्या व्यापाऱ्यांकडे कांदा व लसणाचा साठा आहे, त्या व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे.

 

पावसाळयातील चार महिन्यांत समाधानकारक पाऊस होता. परंतू यावर्षी पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या परतीच्या पावसाने कहरच केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

 

या पावसाने इतर पिकांसह फळभाज्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

Leave a Comment