घराच्या कपाटातून चोरटयाने सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर: संगमनेर शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरटयांनी धुमाकूळ घालत एच.डी.बी स्व्हिहसेस फायनान्शियल कंपनीचे कार्यालय फोडल्याची घटना ताजी असतानाच शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुन्हा चोरटयांनी धुमाकूळ घालत रायतेवाडी याठिकाणी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार ४८५ रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला आहे.

त्यामुळे आता एका मागून एक होणाऱ्या चोऱ्यांमुळे शहर पोलिसही त्रस्त झाले आहेत. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रायतेवाडी याठिकाणी विकी सुनील मंडलिक हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. नेहमीप्रमाणे सर्वजण शुक्रवारी जेवण करुन झोपी गेले होते.

शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने दाराचा कडी कोयंडा उचकाटून आत प्रवेश केला आणि लोखंडी व लाकडी कपाटात असलेले ११ हजार ८९५ रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले टॉप्स, ७ हजार ९९५ रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले वेल,

५ हजार १७५ रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले कर्णफुले, २ हजार ४४५ रुपये किंमतीची पोत, २० हजार २५ रुपये किंमतीचे सोन्याची मनी मंगळसूत्र, ३ हजार ९०० रुपये किंमतीचे दागिने, ७ हजार ५० रुपये किंमतीचे सोन्याचे अंगठी व ५३ हजार रुपयाची रोख रक्कम असा ऐवज चोरीत असतांना त्याचवेळी आवाज आल्याने घरातील लोक जागे झाले होते.

पण तोपर्यंत चोरटयाने हा सर्व मुद्देमाल चोरुन पोबारा केला. घरातील सदस्यांनी कपाटाकडे जावून पाहीले असता तर कपाटात सोन्याचे दागिने व रोख रक्कम नव्हती. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराबाहेर येवून पाहीले असता तोपर्यंत चोरटा दिसेनासा झाला होता.

घटनेची माहिती शहर पोलिसांना समजताच पोलिस निरिक्षक अभय परमार, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरटयाने बरोबर कडी कोयंडा उचकाटून आत प्रवेश केला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

एकूण १ लाख ११ हजार चारशे ४८५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन चोरटयाने पोबारा केला आहे. याप्रकरणी विकी मंडलिक या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७११/२०१९ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी सह्यादी कॉलेजसमोर असलेल्या एच.डी.बी स्व्हिहसेस फायनान्शियल कंपनीचे कार्यालय फोडून आत प्रवेश केला व गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरीवर डल्ला मारत १ लाख ४ हजार रुपये चोरुन पोबारा केला होता.

ही घटना ताजी असताना आज पुन्हा चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. एका मागून एक संगमनेर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने शहर पोलिसही या चोरटयांना वैतागले आहेत.

Leave a Comment