लग्नाळु तरुणांची फसवणुक करणाऱ्या अहमदनगरच्या टोळीचा पर्दाफाश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीरामपूर – बनावट नवरी, आई- वडील, नातेवाईक दाखवून लग्नाच्या बंधनात अडकवून तरुणांना फसवून लाखो रुपयाला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे टोळके देशभर कार्यरत असून ते श्रीरामपूर येथील असल्याचे समोर येत आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बनावट मुलगी उभी करुन बनावट नातेवाईक दाखवून काहींना फसवल्याचा असाच प्रकार श्रीरामपूरमध्ये उघड झाला होता.याबाबत कार्यवाही करून अटकही केली होती. पुन्हा एकदा असाच प्रकार कोल्हापूर मध्ये घडला असून या टोळक्यांचा भांडाफोड झाला आहे.
या प्रकरणात श्रीरामपूरच्या आरोपींचा समावेश आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मध्यमवर्गीय उच्चशिक्षीत मुलगी असल्याचे सांगत तसेच चांगले स्थळ आहे असे भासवून विविध समाजातील उपवर मुलांना लग्नाच्या जाळ्यात ओढण्याचे काम ही टोळी करत होती.
या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार प्रकाश लोढा असून तो बंगलोर येथे वधू – वर सुचक केंद्र चालवत आहे. अनेक तरुण सध्या लग्नाच्या प्रतिक्षेत असल्याने ते वेबसाईटद्वारे लोढाशी संपर्क साधतात. त्यानंतर लोढा हा काही मुली – मुलांना हाताशी धरुन त्यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या मुला – मुलींना स्थळे दाखवून लग्न लावून देतो.
याप्रकारे या टोळक्याने एकाच मुलीचे आतापर्यंत पाच ते सात तरुणांबरोबर लग्न लावून दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हा प्रकार कोल्हापूरमधील एका ३५ वर्षाच्या व्यापाऱ्यासोबत घडला असून या टोळीने त्याच्याकडून  ६ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
लोढा याच्या रॅकेटने चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर, राजस्थान, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आदी ठिकाणच्या व्यापारी वर्गातील लग्रासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना मुली दाखवून आपल्या जाळ्यात ओढून करोडो रुपयाला गंडा घातला असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे ही बनावट नवरी साधारण ६ महिने संसार करून नंतर या ना त्या कारणाने वादविवाद करून घरातील दागिने व पैसा घेवून फरार होणं, असा या टोळीचा फसवणुकीचा फंडा आहे.
या रॅकेटमधील सदस्य हे कोणी नवरी बनतं कोणी नवरीचे आई वडील, कोणी मामा असे नातेवाईक बनतात आणि लग्नासाठी इच्छुक असणार्या व्यापाऱ्यांच्या मुलांना स्थळ दाखवून त्यांची लुटमार करतात. संशयित दीपक शेळके याचा साडू शिवाजी भागुजी धनेश्वर, वय ४४, (रा. रमानगर, औरंगाबाद) याला लग्नाच्या नावाखाली मुलींची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
लोढा याच्या गैंगमध्ये श्रीरामपूरचे दीपक जैन उर्फ दीपक शेळके, जितेंद्र गुंदेचा उर्फ सचिन ब्राम्हणे, पुनम गुंदेचा उर्फ पुनम साळवे, कल्याणी गुंदेचा उर्फ कल्याणी साठे उर्फ भंडारी यांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु त्यांची ही नावेही खरी आहेत की खोटी याबाबतही पोलिसांना शंका आहे.
याप्रकरणी, लग्नाच्या नावाखाली तरुणांना गंडा घालणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती मोठी असून लवकरच या रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

Leave a Comment