महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत दोषींवर तातडीने कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांत दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक झाली. 

महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. मागील काही कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र पोलिस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलिस महासंचालकांच्या परिषदेत झाली. पाेलिसांनी महिला अत्याचाराच्या प्रकरणांत तत्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे. सर्वसामान्य नागरिकाला आदर आणि दरारा वाटेल अशा पद्धतीने पाेलिसांनी काम करावे.

काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदवण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरूपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे.

पोलिसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असेही ठाकरे म्हणाले. या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलिस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांशी व्ह‍िडिओ कॉन्फरन्सवर संवाद साधण्यात आला.

Leave a Comment