अन्नातून विषबाधा एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा – बहिणीचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा – बहिणीचा मृत्यू झाला. संगमनेरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. कृष्णा दीपक सुपेकर (वय ६), श्रावणी दीपक सुपेकर (वय ९) अशी या भावंडांची नावे आहेत.

या दोघांची मोठी बहीण वैष्णवी दीपक सुपेकर (वय १३) हिच्यावर संगमनेरमधील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर हे कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहे.

शहरातील मालदाड रोडवरील आंबेडकरनगर वसाहतीत ते वास्तव्याला आहेत. मोलमजूरी करून सुपेकर व त्यांची पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात गुरुवारी (५ डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास त्यांनी एकत्र जेवण केले.

त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व आजी भागीरथी गंगाधर सुपेकर या सर्वाना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला. मात्र , काही वेळाने त्यांना बरे वाटू लागले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (६ डिसेंबर) सकाळी पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर चौघांनाही शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मात्र , कृष्णाची प्रकृती खालावली व रविवारी (८ डिसेंबर) सकाळी त्याचा मृत्यू झाला. श्रावणीवरही लोणी येथे उपचार सुरी होते.

अचानक प्रकृती खालावल्याने रविवारी अकाराच्या सुमारास तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजी भागीरथी यांची प्रकृती स्थिर असून, मोठी मुलगी वैष्णवी हिच्यावर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कृष्णा आणि श्रावणीच्या मृतदेहांवर सोमवारी दुपारी शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र, विषबाधा नेमकी कशातून झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. वैष्णवी सुपेकर अतिसार, उलटी व थंडीताप आजारांमूळे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.

तिच्या लहान भावाचा घरी, तर बहिणीचा प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डॉ. अतुल आरोटे म्हणाले.

Leave a Comment