टेम्पो पलटी होवून तीन मजूर जागीच ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर : तालुक्यातील आश्वी परिसरातील हंगेवाडी व ओझर रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यामध्ये मालवाहू कापसाचा टेम्पो पलटी होवून तीन मजूर जागीच ठार झाले. गुरुवारी (दि. १२) दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

शेख परवेज शेख नासिर (वय २१, इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव), शेख जुनेद शेख भिकन (वय १९, बिस्मील्ला नगर, जामनेर, जि.जळगाव), शेख फरहान शेख हारून (वय १८, तलहानगर, जामनेर, जि. जळगाव) असे ठार झालेल्या मजुरांची नावे आहेत.

याबाबत आश्वी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवारी दुपारी नाशिक याठिकाणी असलेल्या एका व्यापाऱ्याचा कापूस भरण्यासाठी जामनेर (जि. जळगाव) येथून टेम्पो (क्र. एमएच १८ एम ८६१९) हिच्यावरील चालक वसीम नजीर शेख हा आश्वी परिसरातील हंगेवाडी याठिकाणी आला होता.

कापूस भरून पुन्हा हा टेम्पो हंगेवाडी -ओझर मार्गे बाभळेश्वर फाट्याकडे जात होता. त्याच दरम्यान हा टेम्पो हंगेवाडी व ओझर रस्त्यालगत असलेल्या ओढ्याजवळ आला असता त्यावेळी चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट ओढ्यामध्ये पलटी झाला.

यावेळी ओढ्यामध्ये पाणीही होते. टेम्पोखाली शेख परवेज शेख नासिर, शेख जुनेद शेख भिकन, शेख फरहान शेख हारुन हे तिघेजण दबल्याने तिघाही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरताच आजूबाजूच्या नागरिकांनी ओढ्याच्या दिशेने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.

ओढ्यात पाणी असल्याने नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांनी या तिघांनाही बाहेर काढले व औषधोपचारासाठी रूग्णवाहिकेद्वारे संगमनेरला आणण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला होता.

हे तिघेही लांबचे असल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले होते. त्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात आण्यात आले होते. त्यानंतर आश्वी पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुधाकर मांडवकर यांच्यासह पोलिसांनी कुटीर रूग्णालयात धाव घेतली.

टेम्पोचालक वसीम शेख याची विचारपूस केली. त्यानंतर त्याने तिघांचीही नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार त्याने दिलेल्या माहितीवरून आश्वी पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला आहे.

Leave a Comment