Breaking

बाळासाहेब विखे पाटील…एक उत्तुंग व्यक्तिमत्व

खासदारसाहेब आपल्यातून गेलेत ही कल्पनाच सहन होत नाही. ज्यांना ज्यांना त्यांचा प्रेमळ सहवास लाभला त्यान्च्या मनातून त्यांची स्मृति जाणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या सहवासाचा लाभ ज्यांना झाला ते खरोखर भाग्यवानच म्हणावे लागतील..

या भाग्यवानानपैकी मी एक असल्याने मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू माहीत झाले. ते एक जिंदादील व उत्तुंग व्यक्तिमत्व होते. नगर जिल्ह्यातील राजकारणात असलेले कंगोरे आपणास माहीतच आहेत.

अनेक उघड गट आहेत त्या गटांमध्येसुद्धा अनेक अदृश्य गट आहेत परंतु त्या कशाचाही परिणाम होऊ न देता आपले संबंध टिकविण्याचे कसब जे त्यांच्यामध्ये होते ते क्वचितच ईतरत्र पाहावयास मिळेल.

त्यामुळे त्यांनी हाक मारल्यास त्या हाकेला ओ देण्यामध्ये नेहमीच आनंदाचा अनुभव येत असे. त्यांच्या हातून अनेक मोठीमोठी कामे झाली आहेत व ती सर्वश्रुतच आहेत तथापि पाण्याच्या संदर्भात त्यांचे काम अजोड असून त्यातून त्यांची या विषयाची तळमळ अधोरेखित होते.

याविषयी मी त्यांचेसोबत काम केलेले असल्याने त्याबद्दल सर्वांच्या महितीसाठी या ठिकाणी थोड्या विस्ताराने दिल्यास अनुचित ठरणार नाही. शेतीला सिंचनाची जोड असल्याशिवाय शेती यशस्वी होऊ शकत नाही व जोपर्यंत शेती यशस्वी होत नाही तोपर्यंत शेतकर्‍याचे जीवनमान सुधरू शकत नाही ही त्रिकालाबाधित सत्य हे नेहमी त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता.

त्याबाबतीत काहीतरी आगट्याने केले पाहिजे ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यातूनच ‘महाराष्ट्र पाणी परिषद’ ह्या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्याचे असे झाले वाजपेयी सरकारच्या काळात केंद्र शासनाने राष्ट्रीय नाडीजोड ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. त्या प्रकल्पात एकूण तीस नाडीजोड योजना प्रस्तावित केल्या होत्या.

बाळासाहेबांनी ह्या योजनांचा सखोल अभ्यास केला व त्यांना असे दिसून आले की यात महाराष्ट्राच्या फायद्याची एकही योजना नाही याउलट काही योजना महाराष्ट्रातील पाणी बाहेर नेण्यासाठी आहेत. महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाचा त्यांचा अभ्यास असल्याने व आताच काहीतरी केले पाहिजे या भावनेने ते पेटून उठले व या योजनेचा महाराष्ट्रासाठी फायदा करण्यासाठी चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र पाणी परिषद’ या संस्थेची स्थापना डिसेंबर 2000 मध्ये केली.

परिषदेला कायद्याचे अंनुष्टण प्राप्त होण्यासाठी त्यांनी रीतसर नोंदणी केली परिषदेचा नोंदणी क्रं. दिल्ली 28319 दि. 13/12/2000 असा आहे. असे केल्याने पुढील काळात सर्व प्रकारचा पत्रव्यवहार कायदेशीररीत्या करणे व त्याची उत्तरे मिळविणे शक्य झाले.

असे करत असता पाण्याचे महत्व जाणनार्‍या समविचारी ईतर ठिकाणच्या कर्तुत्ववान व्यक्तींना बरोबर घेतले त्यातूनच त्यांचे साथीदार गणपतराव देशमुख यांना परिषदेचे अध्यक्ष केले व साहेब जाईपर्यंत तेच अध्यक्ष आहेत. या कामात त्यांना सुरूवातीस भुजंगराव कुलकर्णी, जे.टी. जंगले, आर.व्ही.चव्हाण, डा. वराडे, वाय.आर.जाधव,प्रो.भांगरे,डी.वाय.नळगिरकर व नंतर पी.व्ही.पाटील,डी.एम.मोरे हे सहभागी झाले.

मी डा.पोंधे व डा. एन.एम.पाटील आम्ही आमच्या परीने काम करीत होतोच. अभ्यासान्ती परिषदेच्या असे लक्षात आले की राष्ट्रीय नदी जोड योजना जिची किंमत अंदाजे रु.1,60,000 कोटी अनुमानित होती व तिचा महाराष्ट्राला फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होत आहे त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी महाराष्ट्राच्या भूभागाच्या व लोकसंखेच्या प्रमाणात म्हणजे 10 % ईतक्या रकमेच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात अंतर्गत नदीजोड प्रकल्प राबविल्यास कोकणातील वाया जाणारे पाणी व ईतरत्र अतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी कमी पाणी उपलब्ध असलेल्या भागात आणल्यास महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे हिताचे रक्षण करता येईल.

मग त्यांनी त्या दिशेने सर्व तज्ञांची बैठका घेतल्या. या तज्ञांमद्धे पाटबंधारे / कृषि विभागातील माजी अधिकारी, कृषिविद्यापीठांचे कुलगुरू तसेच ईतर जाणकारांचा समावेश असे. विशेष म्हणजे सर्वजण बैठकांसाठी आवर्जून उपस्थित राहत यावरून साहेबांचे या अधिकार्‍यांसोबत असलेले सलोख्याचे व आदराचे संबंधच अधोरेखित होतात.

परिषदेने अंतर्गत नाडीजोडचे 19 प्रस्ताव तयार करून त्याद्वारे 680 TMC पाणी अंतर्गत पाणी वळवून कमी पाणी असलेल्या खोर्‍यांमद्धे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित केले. त्यात मुख्यता मुळासह ऊर्ध्व गोदावरीमध्ये 58 टीएमसी मांजरा खोर्‍यामद्धे 89 टीएमसी तापी खोर्‍यात 25 टीएमसी नीरा खोर्‍यात 40 टीएमसी अशा ठळक तरतुदी होत्या.

सादर योजना शासनास सादर केल्या व त्या पटवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याचे प्रेझेंटेशन महाराष्ट्रातील मुखी मंत्री व ईतर मंत्र्यांना मुंबईत सर्व खासदारांना दिल्लीत तसेच नदीजोड प्रकल्पासाठी नेमलेल्या कार्यागटाचे तत्कालीन प्रमुख व आताचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना साहेबांनी ज्या तळमळीने दाखविले व आग्रह धरला त्यामध्ये केवळ शेतकरी हाच घटक होता हे निर्विवाद सत्य होय.

सर्वोपरी प्रयत्न करूनही दुर्दैवाने या योजनांवर काहीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान काही घटना जशा दमांगंगा – पिंजाल, नार – पार या योजनांबाबत महाराष्ट्र व गुजरात राज्यात सामंजस्य करार झाला, कृष्णा लवादाचा निर्णय झाला ई. घडल्या व नाइलाजाने पूर्वीच्या प्रस्तावांवर पुनर्विचार करण्याची पाळी परिषदेवर आली मात्र साहेबांनी पुन्हा एकदा सर्व तज्ञांच्या मदतीने सुधारित सर्वंकष 19 प्रस्ताव तयार करून त्याद्वारे 734 टीएमसी पाणी अंतर्गत पद्धतीने वाळवून महाराष्ट्रातील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी ही योजना सरकारला सादर केली त्याचे यथोचित प्रेझेंटेशन विद्यमान मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांना पुणे येथे केले. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हे प्रेझेंटेशन अतिशय लक्षपूर्वक ऐकले व यावर लवकरच पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले.

दरम्यांचे काळात मराठवाड्यात दुष्काळ पडल्याने वरील धरणातील पाणी सोडणे भाग पडले व असे करतांना किती भांडणे किती कटुता आली याबद्दल न बोललेले बरे ईतकेच काय भांडण हायकोर्टापर्यंत गेले. सांगावयाचे कारण असे की पुडगे ओढवणार्‍या परिस्थितीची साहेबांना आधीपासून कल्पना होती ते नेहमी म्हणायचे आपल्या योजनांवर निवडकरीत्या प्राधान्यक्रमाने जरी कार्यवाही झाली असती तर खचितच असा प्रसंग ओढवला नसता.

त्यांचे एक गुण वैशिष्ट्य हे की ज्यावेळी आम्ही त्यांना संगत असू की जायकवाडीसाठी लोक विनाकारण त्यांचा पाण्यावर हक्का नसतांना भांडताहेत त्याला त्यांचे उत्तर असे तेही आपले बांधव आहेत सर्वांनाच पाणी मिळाले तर ही भांडणे उदद्भवणारच नाहीत. ईतर काही केले तरी ते तात्पुरते होईल कायम स्वरूपी तोडगा काढणे हेच त्यावर उत्तर होईल.

ह्या त्यांच्या विचाराने सर्वच जन प्रभावित होत व हा नेता हा स्थानिक स्तरावरील नसून राज्य तसेच देश पातळीवरील होता हे निर्विवाद सत्य होय. माझ्या आयुष्यातील एक आठवण सांगावीशी वाटते. मी नगरला अधीक्षक अभियंता असतांना आजारी पडलो एक महिना त्यात गेला परंतु वेळोवेळी साहेब मला फोन करून विचारीत व कोणते औषध घेत आहात त्याचा परिणाम दिसत नसेल तर आपण दुसर्‍या डॉक्टरकडे जानेची गरज आहे काय याविषयी विचारपूस करीत.

तेव्हापासून माझे व त्यांचे वैयक्तिक स्नेहाचे संबंध जुळले ते कायमचेच.मी बरा झाल्यावर त्यांनी माला एका के टी वियरच्या जल पूजनाच्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले. ईतक्या प्रेमळ व उत्तुंग व्यक्तिमत्वाने दिलेले निमंत्रणाचा मी आनंदाने स्वीकार केला. त्या जल पूजनाच्या बातम्या फोटोसह दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये आल्या व अत:पर शांत असलेले राजकीय गट त्वरित कार्यरत झाले व काही दिवसातच माझी बदली शेजारच्या कडा सर्कल मध्ये करण्यात आली.

या सर्व घडामोडीत माझे व त्यांचे संबंध ईतके दृढ झाले की त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत माला त्यांच्या सानिध्याचा लाभ झाला हे मी माझे भाग्य समजतो.

अशा या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिलेल्या व अखंड प्रेमाचा झरा असलेल्या या आदरणीय व्यक्तिमत्वास माझे शतशा प्रणाम व भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा.सुहास धावणे, लोणी

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button