शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- पठार भागातील सावरगाव घुलेनजीक टाळूचीवाडी येथील आशा दादाभाऊ घुले ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात पहिली आली. आशाचे प्राथमिक शिक्षण टाळूचीवाडीत झाले.

माध्यमिक शिक्षण सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेरातील सह्याद्री महाविद्यालयात झाले. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती.

मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिने डीएड करण्याचा निर्णय घेतला. डीएड करतानाच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षक भरती होत नसल्यामुळे आशा दोन-तीन वर्षे घरीच होती.

करमत नसल्यामुळे तिने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर पती नितीन वाळुंज यांनी प्रोत्साहन दिले. परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली. पोलिस उपनिरीक्षकपदासाठी २०१८ मध्ये परीक्षा दिली.

परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अजून मोठ्या पदापर्यंत पोहोचू, असा निश्चय करत विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा दिली. ३५ जागांसाठी राज्यातून साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

त्यापैकी ३६० उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेतून ३५ जणांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली. त्यात आशा राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

Leave a Comment