८३ रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू – आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : शहरातील प्रमुख ८३ रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेने या रस्त्यांच्या कामाचा विकास आराखडा तयार केला आहे. तो लवकरच शासनाकडे पाठवला जाणार आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होईल, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

महापालिका हद्दितील विशेष अनुदानातील मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देण्याबाबत आमदार जगताप यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबई येथे भेट घेतली. महापालिका हद्दीतील विकास कामांना मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत १० कोटी रुपये विशेष अनुदान मिळालेले आहे.

त्यापैकी शासनाकडून ५ कोटी रुपयांची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झालेली आहे. त्यानुसार बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून ५ कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला आहे.

मात्र, उर्वरित कामांना अद्याप कार्यारंभ आदेश दिलेला नाही. कार्यारंभ न दिलेली ही कामे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील डाळ मंडई, सत्था कॉलनीतील आहेत. या कामांसाठी शासनाकडून उर्वरीत ५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जगताप यांनी राज्यमंत्री भरणे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, शहरातील प्रमुख ८३ रस्त्यांच्या कामांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जगताप यांनी महापालिकेतील बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. त्यानुसार या विभागाने सुमारे ७०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा विकास आराखडा तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध झाला तरी शहरातील रस्त्यांचा हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जगताप हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात भाजपचे सरकार होते. त्यामुळे शहरासाठी विशेष निधी मिळाला नाही. परंतु आता राज्यात आघाडीचे सरकार असल्याने शहरासाठी निधी मिळणार असून त्यासासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment