कोरोना विषाणू विरोधातील लोकलढ्याचा क्रूर चेहरा जगासमोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. जागतिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एकट्या चीनमध्ये कोरोनोचे ७२२ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.

जगभरात जवळपास ३४,८०० जणांना लागण झाली आहे. यापैकी ३४,५४६ जण हे एकट्या चीनमधील आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून २५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मकाऊमध्ये १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्राणघातक कोरोना विषाणूविरोधात चीनने पुकारलेल्या लोकलढ्याचा क्रूर चेहरा जगासमोर आला आहे. चीनकडून संशयित रुग्णांना बळजबरीने घराबाहेर काढले जात असल्याचे धक्कादायक व्हिडिओ फुटेज समोर आल्याने चीनच्या लोकलढ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाविरोधात सरकार आणि जनतेच्या सहकार्याने लोकलढा हाती घेतल्याचे शुक्रवारी सांगितले होते. मात्र लोकांना बळजबरीने उचलून रुग्णालयात डांबणे म्हणजेच लोकलढा का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, चीनमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी आजपर्यंतचे सर्वाधिक ८६ बळी गेले असून मृतांचा आकडा ७२३ वर गेला आहे. तर हाँगकाँग व फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनो विषाणूच्या उद्रेकाचे केंद्रबिंदू बनलेल्या वुहान शहरामध्ये संशयित व्यक्तींसोबत अमानवी व्यवहार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयित रुग्णांना त्यांच्या घरातून बळजबरीने बाहेर काढले जात आहे.

यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये संरक्षित सूट परिधान केलेले काही अधिकारी संशयितांना ओढून घेऊन जाताना दिसत आहेत. दोन व्यक्तींना उचलून नेल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीने स्वत:ला वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांना लाथा मारण्यास सुरुवात केली.

परंतु सर्व अधिकाऱ्यांनी मिळून त्याच्या मुसक्या आवळल्या. यानंतर त्यालादेखील घेऊन जाण्यात आले. रस्त्यांवरूनही अशाच प्रकारे काही लोकांना उचलून नेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

जागतिक वैद्यकीय आणीबाणी ठरलेले हे भयंकर संकट हाताळण्याच्या चीनच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून वारंवार आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. चीनमधील सरकारने वुहानमधील सर्व संशयितांच्या जवळच्या लोकांचा शोध घेण्याचे आदेश दिल्याची बाब शुक्रवारी समोर आली होती.

Leave a Comment