अहमदनगरकरांचे दुर्दैव: ‘तो’ कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाणार!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील तारकपूर ते सर्जेपुरा एसटी वर्कशॉप व उपनगरातील टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महल पर्यंत मंजूर असलेली कोट्यवधी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे कार्यारंभ आदेश देऊनही ठप्प आहेत.

नगरोत्थान योजनेच्या व्याजाच्या रकमेतून ही कामे मंजूर असून, लवकरात लवकर कामे न झाल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची दाट शक्‍यता आहे. कंपाऊंड वॉल, झोपडपट्टीची अतिक्रमणे व पाण्याच्या वाहिन्यांच्या अडथळ्यांमुळे ही कामे रखडली असल्याचे समोर आले आहे.

माजी महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यकाळात नगरोत्थान योजनेतील व्याजाच्या रकमांमधून ही दोन कामे प्रस्तावित करण्यात आली होती. टीव्ही सेंटर रस्त्यासाठी 3.84 कोटी तर तारकपूर रस्त्यासाठी सुमारे 2.50 कोटींचा निधी मंजूर आहे. या दोन्ही कामांचे कार्यारंभ आदेशही काही महिन्यांपूर्वी देण्यात आले आहेत.

मात्र, अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. टिव्ही सेंटर येथे कामासाठी रस्ता खोदून अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिक व व्यावसायिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या रस्त्यावरील पाण्याच्या वाहिन्या हटविण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यासाठी अंदाजपत्रकात तरतूदच केलेली नसल्याने ही कामे करायची कशी? असा सवाल निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा विभागाला अंदाजपत्रक करुन जलवाहिन्या हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ही कामे तात्काळ होणे अशक्‍य असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे काम रखडणार असून, निधी परत जाण्याची शक्‍यता अधिक आहे.

दुसरीकडे तारकपूर ते सर्जेपुरा एसटी वर्कशॉप पर्यंत नव्याने रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. 12 मीटर रुंदीचा रस्ता मंजूर असून, त्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र, काम सुरू करण्यापूर्वी येथील झोपडपट्टीची अतिक्रमणे हटविणे आवश्‍यक आहे.

याबाबत सर्वेक्षण होऊन तेथील झोपडपट्टीधारकांना घरकुलांमध्ये पर्यायी जागाही देण्यात आली होती. मात्र, अद्यापही याबाबत कार्यवाही झालेली नाही. तसेच रस्त्यात अडथळा ठरणारी कंपाऊंड वॉल हटविण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते.

त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याचे काम ठप्प आहे. मंजूर निविदेनुसार पुढील महिन्यात कामाची मुदत संपणार आहे. तसेच व्याजाच्या रकमेतून ही कामे प्रस्तावित असल्याने लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास निधी परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment