‘या’ कारणामुळे काढली जाते गावात जावयाची गाढवावरून धिंड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  गावात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची जगावेगळी प्रथा सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी गावात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून पाळली जात आहे.

धुलीवंदन ते रंगपंचमी दरम्यानच्या कालावधीत जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याची निश्चित माहिती नाही असे काही गावकरी सांगतात.

रंगपंचमीला सर्वच ठिकाणी रंगोत्सवाला उधान आलेले असतांना वडांगळीकर मात्र धुलिवंदनापासुनच जावई शोध घेण्यात व्यस्त असतात.

धुलीवंदन ते रंगपंचमी या कालावधीत गावातील घर जावई, गाव जावई अथवा गावकरी ज्यांना जावयाच्या नात्याने वागवतात अशा व्यक्तींचा या जगावेगळ्या धिंडीसाठी प्राधान्याने विचार केला जातो.

नोकरी-व्यवसायानिमित्त गावात बाहेरून येऊन स्थायिक झालेले व्यापारी, नोकरदार व्यक्तींशी गावकऱ्यांकडून जावयाचे नाते लावले जाते. त्यांच्या बायकांना मुलीचा दर्जा दिला जातो. त्यांच्याशी गावातील तरुण मंडळींचे चेष्टेचे नाते निर्माण होते.

दाजी दाजी म्हणत बहिणीच्या या नवऱ्याचा वर्षभर मान राखायचा. मात्र, शिमग्याला वर्षभराचे उट्टे काढत त्याची गाढवावरून धिंड काढण्याची ही प्रथा मजेदार म्हणावी लागेल.

जावयाला धिंडीसाठी राजी करणे हे मोठे दिव्य असते. कोणीही जावई राजीखुशीने स्वतःची धिंड काढून घ्यायला तयार होत नसतात. मग गावातील तरुण मंडळींकडून जावयावर साम-दाम-दंड-भेद, इमोशनल ब्लॅकमेलिंग अशी सर्व आयुधे वापरली जातात. त्यासाठी गुप्त मसलती, खलबते केली जातात.

अनेक जावई होळी रंगपंचमीच्या काळात गावाकडे चुकून देखील फिरकत नाहीत. किंवा गावात राहणारे गावाबाहेर निघुन जातात. पण प्रत्येकवेळी एखादा का होईना खिलाडू वृत्तीचा जावई सापडतोच.

ग्रामस्थांच्या दृष्टीनेही असा जावई म्हणजे टप्प्यातील सावध असते. किरकोळ आढेवेढे घेत प्रसंगी चांगला पाहुणचार पदरात पाडून हा जावई गाढवा बसायला तयार होतो. जावयाची मनधरणी करणाऱ्या व्यक्तीकडेच बहुतेक वेळा प्रथेचे यजमानपद येते.

मग धिंडीसाठी लागणारा खर्च, त्यानंतर जावयाला करावयाच्या पंचवस्त्र पोशाख याचा खर्च करावा करावा लागतो. मनधरणी मिनतवाऱ्या करून तयार झालेला जावई गाढवावर बसवला जातो. त्याच्या अंगावरील कपडे फाडले जातात.

गळ्यात कांद्याचा, फाटक्या चपलांचा हार घातला जातो. कधी फाटक्या टायरचे देखील हार असतात. डोक्याला मोत्यांऐवजी लसणाच्या मुंडावळ्या आणि फाटक्या सुपाचे बाशिंग बांधले जाते.

मग यजमानाच्या घरापासून ही मिरवणूक सुरू होते. होळीतील राख, रंग, चिखलमाती याची मनसोक्त उधळण करत गावातील प्रत्येक गल्लीतून हा जावई गाढवावरून मिरवला जातो. सासरेबुवांची कुंडलीतील दशम ग्रह समजल्या जाणाऱ्या जावयाची धिंड म्हटल्यावर मिरवणुकीत चांगलाच जोश संचारतो.

बोंबला रे बोंबला म्हणत जावयाच्या विविधांगी गुणांचे (अवगुणांचे देखील) वर्णन करत बोंबा मारल्या जातात. अनेक घरांपुढे खास थांबवून कांद्याच्या फुलांच्या माळा जावईबापूंच्या सगळ्यात अडकवल्या जातात. जावयाची गाढवावरून धिंड निघाली की गावच्या दुष्काळाचे सावट दूर होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment