‘सारीची’लक्षणे असणार्‍या रुग्णांवर आता जिल्हा प्रशासनाची नजर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  अहमदनगर जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यात श्र्वसनाचा त्रास जाणवणारे (SARI) सारीचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच पावले उचलून त्यासंदर्भातील कार्यवाहीस सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या शोधाबरोबरच आता सारीचे रुग्णांचेही तात्काळ निदान व्हावे, यासाठी यंणत्रेने तयारी केली आहे. त्यामुळे आता तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास, न्युमोनिया, सर्दी , खोकला, घशात खवखव असा त्रास होत असेल अशा प्रत्येक रुग्णाची तपासणी अशा सीसीसी मधून होणार आहे. त्यानंतर या रुग्णांची लक्षणे बघून त्यांच्यावर उपचार केले जाणार असून त्यांची कोविड अर्थात कोरोनासाठीची चाचणीही केली जाणार आहे. तसेच प्रत्येक टप्प्यावर त्यांना योग्य उपचार मिळतील, असे नियोजन तालुका आणि जिल्हा पातळीवर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जिल्‍हयातील सर्व खाजगी व्‍यवसायिक डॉक्‍टर यांना त्‍यांचे दवाखाना वा रुग्‍णालयात आलेल्‍या बाहयरुग्‍ण व आंतरुग्‍णामध्‍ये खोकला, ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे रुग्‍ण आढळल्‍यास, त्‍यांना त्‍वरीत जिल्‍हा रुग्‍णालय अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे आदेश जारी केले होते.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन त्याचे उल्लंघन करणार्‍या खासगी व्यावसायिक डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पषट् केले होते. आता यासंदर्भात अधिक सुसूत्रता यावी आणि सारीचा प्रसार आणि प्रादुर्भाव वेळीच रोखता यावा, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत अशा रुग्णांची तपासणी सीसीसी मार्फत केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी रविवारी सायंकाळी यासंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून याबाबत आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाने ज्यांना श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत आहे ( Severe Acute Respiratory Illnes (SARI)) अशा नागरिकांचे सर्व्‍हेक्षण करणेबाबत निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार SARI रुग्‍णाची व्‍याख्‍या खालील प्रमाणे आहे. ज्या ०५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना आचानक सुरु झालेला 38 अंश सेल्‍सीयस ताप असेल, खोकला, घशात खवखव जाणवत असेल, धाप लागणे, श्‍वास घेण्‍यास त्रास होणे आणि रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता भासत असेल तसेच याशिवाय, ज्या 5 वर्षाखालील मुलांना न्यूमोनिया असेल आणि रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता भासत असेल अशा व्यक्तींना सारी रुग्ण म्हणून ओळखले जाते.

जिल्ह्यात अशा रुग्णांची नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला आदेश दिले होते. त्यानुसार गाव आणि तालुकानिहाय अशा रुग्णांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनीही अशा रुग्णांची माहिती जवळच्या आरोग्य यंत्रणेला द्यावी. जेणेकरुन संबंधित रुग्णावर वेळेत उपचार करणे शक्य होईल आणि सारीच्या प्रसाराला आळा बसेल, असे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, आता आरोग्य यंत्रणेकडून एक पाऊल पुढे जात अशा रुग्णांना सीसीसी मार्फत तपासणी करुन नंतर त्यांच्यावर योग्य उपचार होतील, या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. सीसीसी मधून तपासणी केलेल्या ज्या व्यक्तींमध्ये अशा आजाराची लक्षणे दिसतील त्यांना विशेष कोविड केअर सेंटर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येईल.

याशिवाय, त्यांची कोविड चाचणीही केली जाईल. अशा सेंटरमध्ये श्वसनाचा त्रास होणार्‍या रुग्णांसाठी अत्यावश्यक असणार्‍या ऑक्सिजन सिलींडरची व्यवस्था करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या रुग्णांची चाचणी केली जाईल, त्यानंतर प्रयोगशाळेतून त्यांच्या स्त्राव चाचणी नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर जे कोरोना बाधित रुग्ण आहेत, त्यांच्यावर विशेष कोविड केअर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. अशाप्रकारे आता या रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment