Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtraSpacial

आणि पंधरावर्षांपूर्वी अपघातात निधन झालेली महिला जिवंत अवस्थेत परतली…

अहमदनगर / अकोले :- मागील सुमारे पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या महिलेचे एका अपघातात निधन झाल्याची माहिती तिचे कुटुंबियांना मिळाली. ती ग्राह्य धरून नातलगांनी तिचे श्राद्ध कर्मही केले आणि अचानक ती महिला जिवंत अवस्थेत परतली. सटाणा, इगतपुरी, अकोले येथील पत्रकारांनी पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या या वृद्धेला तिच्या कुटुंबात परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच या लॉकडाऊनच्या काळातही तिला आपली हक्काची माणसं पुन्हा भेटली.

सटाण्यातील निर्वासितांच्या चौकशीत ही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना आढळली. त्यांनी तिने दिलेल्या माहितीच्या आधारे सव्यापसव्य करीत तिच्या घरच्यांचा शोध लावला आणि अखेर १५ वर्षांपूर्वी जिचे श्राद्ध घातले होते ती आपल्या पतीदेवाला भेटली! नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या कोकणवाडी येथील भीमाबाई खंडू जाधव या पंधरा वर्षांपूर्वी आपल्या परिवारापासून दुरावल्या.

जाधव परिवार भटक्या जमातीतील. साहजिकच आपल्या आप्तस्वकियांचा शोध कोठे घ्यावा, या विवंचनेत त्या तब्बल १५ वर्षे राज्यात अनेक गावांमध्ये भटकल्या. दरम्यान, चार-महिन्यांपूर्वी त्या सटाण्यात पोहोचल्या. सध्या कोरोनाचे संकट भयावह होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सटाण्यात निर्वासितांची माहिती घेत असताना सामाजिक कार्यकर्त्यांना भीमाबाईची कैफियत समजली. भीमाबाईंनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या परिवाराचा शोध घेण्याचा निश्चय सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.

सटाणा येथील संजय खैरनार, महिला बालविकास विभागाचे सदस्य श्याम बगडाने, रमेश भामरे, कल्पेश निकम यांनी भीमाबाईची विचारपूस केली. त्या माहितीनुसार सर्वतीर्थ टाकेद आणि कोकणवाडी येथील पोलीस पाटील कैलास फोकणे तसेच तुपे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. याशिवाय संगमनेर व अकोले तालुक्यांतील काही ओळखीच्या लोकांकडून कोकणवाडी येथील सरपंचांशीही संपर्क साधण्यात आला.

‘ भीमाबाई या पंधरा वर्षांपूर्वीच अपघातात ठार झाल्या, त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार झाल्याचे समजल्यामुळे परिवाराने परंपरेनुसार श्राद्धादि उत्तरकार्य पार पाडले. त्यानंतर त्यांच्या पतीने दुसरा विवाह केला’ अशी माहिती या शोध प्रवासात हाती लागली. भीमाबाई हयात असल्याचे या कार्यकर्त्यांनी कोकणवाडीच्या सरपंचांना कळविल्यावर सरपंचांनी भीमाबाईचे पती खंडू जाधव यांचा दूरध्वनी क्रमांक कार्यकर्त्यांना दिला.

मग खंडू जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना भीमाबाई हयात असल्याची सुखद वार्ता देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी सटाणा पोलिसांच्या मदतीने भीमाबाईंना सोबत घेऊन नाशिक गाठले. इंदिरानगर शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

पोलिसांच्या मदतीने हवालदार गवळी, छगन सोनवणे, शिवसैनिक संदेश एकमोडे यांनी पाथर्डी परिसर पिंजून काढला आणि अखेर गौळणे रोडवर वीटभट्टीच्या जवळ किर्लोस्कर फार्म हाऊस येथे जाधव परिवार सापडला! कार्यकर्त्यांनी पुन्हा सारी चौकशी करीत भीमाबाई आणि खंडू जाधव यांची पुनर्भेट घडवून आणली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button