महत्वाची बातमी : ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहिम झाली गतिमान,घरोघरी होतेय सर्वेक्षण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर  :- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करुन ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करुन आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते.

त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावा बरोबरच जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळून येत असल्याने या रुग्णांना शोधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या दवाखान्यात आलेल्या अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठविण्याबाबत आदेशही जारी करण्यात आले होते.

मात्र, या आजाराची लक्षणे असणारे रुग्ण रुग्णालयापर्यत येईस्तोवर ते इतरांना प्रादुर्भाव करु शकतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आता अशा रुग्णांची शोध मोहिमच सुरु केली आहे. लगतच्या जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हाच जिल्हा प्रशासनाने हे काम सुरु केले होते. आता ही मोहिम अधिक गतीमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले आहेत.

रुग्णाची तब्बेत बिघडली तरच ते रुग्णालयाकडे धाव घेतात. त्यामुळे तोपर्यत संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी यंत्रणेने सकारात्मक पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, अशा सूचना श्री. द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यानंतरच रुग्ण शोधण्याची मोहिम सुरु करण्यात आली. त्यासाठी नागरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत.

सर्व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात अशा प्रकारची पथके स्थापन करण्यात आली आहेत. संगमनेर मध्ये एकूण २२० पथके तयार केले गेले आहेत. त्यात नगरपालिका क्षेत्रातील २० आणि ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी २०० पथके राहणार आहेत. ही पथके दररोज प्रत्येकी सुमारे ५० घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करत आहेत.

दररोज सुमारे ५५ ते ६० हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. या पथकांवर निरीक्षणासाठीही वेगळे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. सारीची लक्षणे असणार्‍या अशा रुग्णांवर उपचारासाठी संगमनेरमध्ये खास क्लिनिक तयार केले आहे. राहुरीमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. तालुक्यात एकूण २१७ पथके तयार झाले आहेत.

नगरपालिका क्षेत्रातील १७ आणि ग्रामीण भागातील २०० पथकांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. मॅपिंगद्वारे हे पथक कुठे जाते आणि किती घरांना भेटी देते हे ऑनलाईन पद्धतीने पाहिले जात आहे. राहुरी मध्येही दररोज सुमारे ५० हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. श्रीरामपूरमध्ये नगरपालिका क्षेत्रासाठी एक १ पथक तर ग्रामीण भागासाठी १७७ पथके कार्यरत आहेत.

कर्जत ब्लॉकमध्ये ग्रामीण भागातील १९६ सर्वेक्षण पथके आणि शहरी भागातील १९ पथके सारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी २६ पर्यवेक्षकांमार्फत पर्यवेक्षण केले जात आहे. पाथर्डी तालुक्यात ग्रामीण भागातील १७५ आणि शहरी भागातील १० पथके सारी आजारावर पाळत ठेवण्याचे काम करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment