‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात विलगीकरणानेच मिळेल विजय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर, दि.22 :  नागपूर शहर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सेवा असतानाही राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर शहर आणि विभागातही कोरोना रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे. हे येथील सतर्क प्रशासकीय यंत्रणा, लॉकडाऊनदरम्यान लोकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवून दिलेली साथ यामुळेच शक्य झाले.

यापुढेही लॉकडाऊनला प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने घेतले तर नागपूर विभागातील साखळी लवकरच तुटेल. विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने करावा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

‘कोरोनावरील उपाययोजना आणि नागपूर विभाग’ या विषयावर नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी ‘फेसबुक’लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नागरिकांना विलग राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन केले. केंद्र आणि राज्य शासनाने जे लॉकडाऊन घोषित केले आहे,

ते तुमच्या-आमच्या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा आता प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असेल तरी हा त्रास आपल्या सुरक्षित भविष्यासाठी सहन करावा लागेल. नागरिकांनी आतापर्यंत दिली तशीच साथ पुढेही दिली तर नागपूर विभागात कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंध घालता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी नागपूर विभागातील कोरोनाची स्थिती, प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना आणि भविष्यातील तयारी याबाबत विस्तृत माहिती दिली. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण वगळता नागपूर विभागातील अन्य जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आहे.

तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वारंवार भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी नियमित सुरु आहे.

ऑक्सिजन सिलिंडर, बेडची व्यवस्था, औषधांचा साठा, मास्क व अन्य वस्तूंचा साठा सध्या मुबलक असून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची चमू दिवसरात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत कार्य करीत आहे. बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरातील असल्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळले तो भाग महानगरपालिका प्रशासनातर्फे तातडीने सील करण्यात आला आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना लगेच क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर बऱ्याच अंशी अंकुश मिळविता आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलगा सावलीमध्ये आई तेलंगणात आणि मुलाच्या वडिलांचा मृत्यू अशा परिस्थितीत आईला गावाकडे आणण्याची व्यवस्था होईल का, या प्रश्नाच्या उत्तरात विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार म्हणाले की, संपूर्ण देशाची दैनंदिनी थांबविली आहे. ती साऱ्यांच्याच हिताची आहे.

त्या माऊलीचे दु:ख आणि त्या मुलाची ओढ आम्ही समजू शकतो. मात्र, देशासाठी आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी हा त्याग करावाच लागेल. लॉकडाऊन संपेपर्यंत तसा विचारही करता येणार नाही, असे ते म्हणाले. याव्यतिरिक्त अन्य प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे देत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.

समुपदेशनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत असलेल्या समाजकल्याण महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची मदत घ्यावी, या सूचनेचेही त्यांनी स्वागत केले. भाजीपाला बाजार आठवड्यातून तीन दिवस सुरू ठेवल्यास होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल, या सूचनेलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, नक्कीच विचार करु, असे सांगितले.

Leave a Comment