मनपाने शास्ती माफ करुन सवलतीची मुदतवाढ द्यावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर – सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे देशव्यापी बंदमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अहमदनगर मनपाच्यावतीने घरपट्टी वसुलीवर लावण्यात येणारे दरमहा 2 टक्के शास्ती माफ करुन व संकलित करावरील 10 टक्के सवलतीची मुदतवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्या परिस्थितीत संपूर्ण देश कोरोना व्हायरस या संकटामध्ये सापडला आहे. नगर शहरातील अनेक व्यवसायिक, रहिवासी व सर्वसामान्य बेरोजगार नागरिक हे सर्व देशव्यापी बंदमुळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. कोरोनामुळे सुरु असलेल्या देशव्यापी बंद कालावधी आजही अनिश्‍चित दिसत आहे.

मनपा घरपट्टी वसुलीबाबत संपूर्ण शहरामध्ये अनेक नागरिक घरमालकांशी संवाद साधला असता, देशव्यापी बंदच्या संकटामुळे सर्व घटकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. अनेक बँका, सहकारी संस्था व सेवा देणार्‍या संस्था यांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्वरुपात दिलासा दिलेला आहे.

मनपाकडे शास्ती थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असून कोरोनामुळे ही रक्कम भरण्याची क्षमता नागरिकांमध्ये आजतरी नाही म्हणून संपूर्ण शास्ती माफ करावी व संकलित करावरील आकारणीवरील 10 टक्के सवलतीत देशव्यापी बंद संपेपर्यंत मुदतवाढ द्यावी.

मनपा ही सुद्धा सेवा देणारी संस्था आहे. या संकटामधून आपल्या संस्थेने अशाच प्रकारचा दिलासा देऊन सर्वसामान्य नागरिकांना मोलाचे सहकार्य करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वमान्य तोडगा काढू, असे आश्‍वासन दिल्याचे भगवान फुलसौंदर यांनी सांगितले.

Leave a Comment