रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी स्वॅब टेस्टिंग बूथची उभारणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक असून पीपीई कीट ची संख्या मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबत मर्यादा आहेत.

या विषाणूची लागण तपासणी करणाऱ्यांना होऊ नये, याकरिता उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून एमआयडीसी असोसिएशनतर्फे जिल्ह्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित एकूण 10 स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ (स्वॅब टेस्टिंग क्यूब) देण्यात आले आहेत.

महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाड यांच्यातर्फे जयदीप काळे यांनी महाड तालुक्यासाठी दोन, माणगावसाठी एक, तळासाठी एक, पोलादपूरसाठी एक तसेच रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, रोहा यांच्यातर्फे श्री.बारदेस्कर यांनी रोहासाठी दोन, श्रीवर्धनसाठी एक, म्हसळासाठी एक तर पालीसाठी एक असे एकूण दहा स्वॅब टेस्टिंग क्यूब पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे आज सुपूर्द केले.

सध्या वाढत जाणाऱ्या संशयित कोरोना बाधित रुग्णांची स्वॅब सॅम्पल तपासणी जलद गतीने होण्यासाठी कोविड – 19 स्वॅब सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसित केले असून रायगड जिल्ह्यात कार्यान्वित करण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे.

करोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. या स्वॅब टेस्टिंग बूथमुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामध्ये सुरक्षित अंतर राहील व त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही.

रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी एकूण 10 ठिकाणी हे बूथ बसविण्यात येत आहेत. याद्वारे पीपीई किट चा खर्च वाचेलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणीदेखील होऊ शकेल. तसेच, या उपकरणामुळे पीपीई किट्सचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्वॅब सॅम्पल घेता येतील.

Leave a Comment