लॉकडाऊनच्या काळात ३०७ सायबर गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई दि. २८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली असून राज्यात ३०७ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३०७ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे           

दाखल गुन्ह्यांमध्ये बीड २८, पुणे ग्रामीण २४, मुंबई २०, कोल्हापूर १६, जळगाव १५, सांगली १२, नाशिक ग्रामीण १२, नाशिक शहर ११, जालना ११, सातारा १०, बुलढाणा १०, लातूर १०, नांदेड ९, ठाणे शहर ८,परभणी ७, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, ठाणे ग्रामीण ६, हिंगोली ६,नागपूर शहर ६, पालघर ६, अमरावती ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, भंडारा ३, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, पिंपरी- चिंचवड १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १२७ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  टिकटॉक व्हीडिओ शेअर प्रकरणी १० गुन्हे  व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत.

इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल व अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये (आतापर्यंत ११५ आरोपींना अटक केली असून  ३६ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात आल्या.

अमरावती

अमरावती शहरांतर्गत गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती शहरांतर्गत नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या ६ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादी हा कोरोनाग्रस्त रुग्ण आहे अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर करून फिर्यादीबद्दल अफवा पसरविली होती .

नाशिक ग्रामीण

नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यात नोंदणीकृत गुन्ह्यांची  संख्या १२ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपींनी स्वतः सदस्य असणाऱ्या ग्रुपवर कोरोना महामारीच्या संदर्भात चुकीची माहिती असणाऱ्या पोस्ट्स पाठविल्या होत्या .ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन ,कायदा व सुव्यस्वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

अनधिकृत संकेतस्थळ टाळा

सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे . त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाचे वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की,शक्यतो ऑनलाईन  असणारी पुस्तके,साहित्य,गाणी,चित्रपट ,वेबसेरीज व अन्य गोष्टी या अधिकृत  संकेतस्थळावरून (website) विकत घ्याव्यात किंवा बघावे .

अशा गोष्टी अनधिकृत संकेतस्थळांवर(website) बघणे हा कायद्याने गुन्हा आहेच.  तसेच अशा संकेतस्थळांवरून (website)तुमच्या नकळत एखादे malware किंवा computer virus बॅकग्राऊंडला तुमच्या अपरोक्ष डाउनलोड होऊन तुमचा लॅपटॉप ,computer किंवा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. याची काळजी घ्यावी.

Leave a Comment