कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय – गृहमंत्री अनिल देशमुख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जळगाव, (जिमाका) दि. 28 : कोरोनाची साखळी तोडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याची कोरोनाचा परिस्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री यांनी आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे,

वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रांताधिकारी दिपमाला चौरे, ॲङ रविंद्र पाटील, अभिषेक पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना गृहमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, देशाबरोबरच राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून जे रुग्ण कोरोना बाधित आढळून येतील त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तातडीने घेऊन त्यांना सामाजिक क्वारंटाईन करावे.

बाधित रुग्ण ज्या भागातील रहिवासी असेल त्या भागास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्याची तपासणी प्राधान्याने करुन घ्यावी. त्या भागातील नागरीकांना परिस्थितीची कल्पना देऊन घरातच राहण्याचे आवाहन करण्यात यावे.

त्याचबरोबर पुढील महिन्याच्या धान्याचे वाटप करतांना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. धान्यवाटपाचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

निवारागृहात असलेल्या परप्रांतीय मजूरांबाबत राज्यस्तरावरुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्व मजूरांची व्यवस्थित काळजी घेण्याच्याही सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

सध्या शेतीचा खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासाठी तातडीने पैशांची आवश्यकता असल्याने सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली रक्कम एकरक्कमी रोखीने देण्यात यावी. जेणेकरुन त्यांना वारंवार रक्कम काढण्यासाठी एटीएमला यावे लागणार नाही अशी सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थतीची माहिती दिली. जिल्ह्यातील अमळनेर व भुसावळ तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहे.

जिल्ह्यात अन्नधान्याची कुठलीही अडचण नाही. त्रिस्तरीय रचनेनुसार जिल्ह्यात 8 हजार बेड तयार करण्यात आले असून 24 हजार बेड तयार करण्याचे नियोजन आहे.

मालेगांव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने धुळे येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने जळगावच्या संशयितांचे नमुने अकोला प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे प्रशासनाचे नियोजन असून जिल्ह्यासाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा मंजूर झाली आहे.

प्रयोगशाळेसाठी निधीची कुठलीही अडचण नाही. फक्त मशिनरी येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्यातच जिल्ह्यातील 100 पोलीस मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले आहेत. सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने पोलीस विभागाच्या मदतीला रेल्वे पोलीस फोर्सची मदत घेता येईल अशी सुचना पोलीस अधीक्षक डॉ उगले यांनी केली.

Leave a Comment