ससूनच्या सोईसुविधांचा विभागीय आयुक्तकडून आढावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे, दि.२९ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांकडून ससून रुग्णालयात उपलब्ध व आवश्यक सोईसुविधांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे, भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक तथा  समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

ससून रुग्णालयात आवश्यक ती पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू करा, अशा सूचना देत डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी.

ससून रुग्णालयात येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे आवश्यक आहे,कोरोना विषाणुच्या अनुषंगाने माहितीचे संकलन अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देत रुग्णाला कोविडबाबत समूपदेशन महत्त्वाचे असल्याचे सांगून आवश्यक त्या सर्व सोईसुविधा व साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. यावेळी ससून रुग्णालयातील विविध विभागाचे प्रमुख, डॉक्टर उपस्थित होते.

Leave a Comment