असेल स्वच्छ चूल तर कोरोनामुक्त बनेल घरकुल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

‘स्वच्छ इंधन, सशक्त जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजनेतंर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील 2 लाख 24 हजार  महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या डोळ्यांवर व शरीरावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम टाळण्यासाठी, ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर झालेच आहे.

त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती. परंतु या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरापर्यंत एल.पी.जी. सिलेंडर पोहचले आहे. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही योजना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गॅस कंपन्या व पुरवठा विभागाने घराघरापर्यंत पोहचवली आहे.

कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊनची घोषणा झाली, जीवनावश्यक सेवेत सरकारी गॅस कंपन्या व त्यांच्या वितरकांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील ग्राहकांची व्याप्ती आणि लोकांची गरज लक्षात घेवून प्रत्येक घरात या काळात स्वच्छ इंधन म्हणून गॅस सिलेंडरर्सचा पुरवठा करण्याचे मोठे आव्हान होते, हे आव्हान इथल्या वितरकांनी सक्षमपणे पेलले आहे.

केंद्र सरकारची महत्त्वांकाक्षी योजना म्हणून असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना व वन विभागाच्या गॅस सिलेंडर या योजनांच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे गरीब गृहिणींच्या जनतेच्या जीवनात महत्त्व वाढलेले आहे. हे गॅस सिलेंडर आदिवासी महिला व कुटूंबांच्या आरोग्यदायी जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहे. हे सिलेंडर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पुरविण्याचे काम सध्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन  इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून अत्यंत वेगाने सुरू आहे.

परंतु आज कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या विषाणूचा संसर्ग आपल्या संपर्कातील येणाऱ्या कोणत्या मार्गाने होईल हे सांगणे अवघड झाल्याने स्वच्छतेची कास सोडून चालणार नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट किंवा वस्तूची स्वच्छता व तिला निर्जंतुक करणे महत्त्वाचे आहे.

याच बाबींचा विचार करून, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत जिल्‍ह्यातील केंद्र सरकारच्या भारत गॅस कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व वितरकांमार्फत सिलेंडरचा पुरवठा करताना देखील निर्जंतुकीकरणाच्या माध्यमातून नागरिक व पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.

भारत गॅस कंपनीच्या अंतर्गत येणारी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भारत गॅस एजन्सी आदिवासी पाड्या वस्त्यांवर सिलेंडर पुरवितांना स्वच्छतेची काळजी घेते आहे. म्हणजे पुरविण्यात येणारे प्रत्येक सिलेंडर सौम्य सोडियम हायपोक्लोराईड, सोप सोल्युशन आणि पाणी यांच्या मिश्रणाचा फवारा करून सॅनीटाइज करण्यात येते.

सॅनीटायझेशनची ही प्रक्रिया सिन्नर येथील मुख्य फॅक्टरीतून सिलेंडर निघाल्यापासून सुरू होते, प्लांटमध्ये सिलेंडर रासायनिक मानकांप्रमाणे प्रक्रिया करूनच वाहनात भरले जातात, त्यानंतर संबंधित वाहनावरही निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात येते. इगतपुरी येथील सिलेंडरच्या गोदामात सिलेंडर उतरवण्यापूर्वी आणि उतरवल्यानंतर प्रत्येक सिलेंडरवर रासायनिक फवारणी करून निर्जंतुक करण्यात येते.

यासह गावागावात घरपोच देण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये देखील सिलेंडर भरताना आणि भरल्यानंतर सिलेंडर ग्राहकाच्या घरापर्यंत पोहचविण्याच्या या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अगदी काळजीपूर्वक करण्यात येत आहे. तसेच भरलेले सिलेंडर दिल्यानंतर प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारे रिकामे सिलेंडर सुद्धा ह्याच प्रक्रियेतून निर्जंतुक करण्यात येते.

या सिलेंडरच्या निर्जंतुकीकरणाला जितके महत्त्व दिले गेले आहे तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्व ही सर्व प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतही दिले जात आहे. सिलेंडरची देवाण घेवाण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क व सॅनीटायझर पुरविण्यात आले आहे. दिवसाला साधारण 270 किंवा त्यापेक्षाही अधिक ग्राहकांपर्यंत पोहचणारी ही मंडळी त्यांचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे.

त्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासोबतच ग्राहकाचे संरक्षण करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे भारत गॅसचे आनंद चांडक यांनी सांगितले आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी भारत गॅस कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या वितरकांमार्फत करण्यात येणारी ही उपाययोजना प्रत्येक वितरकांने अवलंबवावी असे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी सांगितले आहे.

कोरोना विरूद्धच्या या लढाईत संसर्गावर मात करण्यासाठी स्वच्छता, सामाजिक अंतर याबाबींची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात यावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणा प्रयत्न करीत आहेत.

हे सर्व नियम पाळत असताना शहरी भाग असो किंवा दुर्गम भागातील जनता कोणीही जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यापासून वंचित राहणार नाहीत, प्रत्येकाला त्यांच्या हक्काच्या जीवनावश्यक वस्तू स्वच्छ व वेळेत मिळतील यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छागन भुजबळ व त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांचेही प्रयत्न निरंतर आहेत.

आजही निमशहरी, ग्रामीण भागात व आदिवासी दुर्गम वाड्यापाड्यात चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपरिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या बळी ठरत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी  ग्रामीण भाग चूल विरहित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अनेक प्रकारच्या चुलींच्या रचना वापरात आल्या परंतु परिस्थिती आहे तशीच राहिली. चुलीतील धुरामुळे महिलांना त्रास होतो आणि त्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतच पसरणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात.

जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, चिपाड, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वयंपाक करावा लागतो. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते.

ते दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून व राज्य शासनाच्या समन्वयातून प्रधानमंत्री ‘उज्ज्वला योजना’ कार्यान्वित करण्यात आली. सर्वसामान्यांना परवडणारे इंधन म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना होय. हे इंधन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ‘स्वच्छ इंधन, सशक्त जीवन’चा नारा देत घराघरात सोशल डिस्टन्सिंग पाळून पोहचवले जात आहे.

महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे,

घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणेहा मुख्य उद्देश या योजनेचा आहे, त्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर ‘असेल स्वच्छ चुल तर कोरोनामुक्त बनेल घरकुल’ या संकल्पनेची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रदूषण मुक्त गॅस इंधन चालवतंय घराघरातल्या कोविडमुक्तीचे इंजन.

अर्चना देशमुख-खैरनार

सहाय्यक संचालक,

विभागीय माहिती कार्यालयनाशिक

Leave a Comment