एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. ३० : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोविड १९ लक्षणे नसलेल्या परंतु कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोरोना निगा केंद्रांमध्ये (कोविड केअर सेंटर – सीसीसी)पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा त्यांना सल्ला द्यावा, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

मुंबईतील कोविड १९ रुग्णांची संख्या पाहता या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत कुणीही त्यापासून वंचित राहू नये तसेच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत.

मुंबई महानगरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात यावे. जेणे करून रुग्णवाहिकांची ने-आण करताना सुसूत्रता येईल. कुठलाही रुग्ण मग तो कोरोना संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, तो रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे.

अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी केली जावी. मात्र कुठल्याही परिस्थितीत एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना परत जाता कामा नये याची दखल घेतली पाहिजे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलविणे, दाखल करून घेणे आणि घरी सोडणे याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी , असे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.

मुंबई असलेल्या रुग्णालयातील उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक विशिष्ट ओळखक्रमांक देण्यात यावा.

हा क्रमांक मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिला जावा, त्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेतले जाऊ नये असेही निदेश अधिसूचनेत दिले आहेत. या कार्यपद्धतीमुळे कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत याची निश्चित माहिती मिळू शकेल.

कोविड१९ संशयित रुग्णांना उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन दाखल करून घ्यावे. त्यांचा नमुना अहवाल १२ तासात मिळेल अशी व्यवस्था करावा आणि रुग्णाला असलेल्या त्रासानुसार त्याला कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे हलविण्यात यावे.

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत मृतदेह वॉर्ड मधून हलविण्याबाबत कार्यवाही करायची आहे. तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करायची जी कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे त्यानुसार १२ तासाच्या आत ते पूर्ण करायचे आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Leave a Comment