जीवाची पर्वा न करता हा पोस्टाचा “कोरोना योद्धा” करतोय काम…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणू चे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अहोरात्र काम करत आहे. संपूर्ण देशभर लॉक डाउन सुरूच आहे तरी देखील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील लॉक डाउनच्या अमलबजावणीसाठी पोलीस कर्मचारी, अधिकारी खूप मेहनत घेत आहेत.

त्याच प्रमाणे डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचारी हे देखील आपला जीव धोक्यात घालून या लढाई मध्ये आपले मोलाचे योगदान देत आहेत. या सर्व कोरोना योद्ध्यांचे सध्याच्या परिस्थितीत कौतुक करावे तेवढे थोडेच. परंतु आणखी एक कोरोना योद्धा ज्याकडे आपले लक्ष वेधले जात नाही तो म्हणजे पोस्टमन. लॉक डाउन सुरू झालेल्या दिवसापासून हा कोरोना योद्धा कर्तव्य बजावत आहे.

केंद्र सरकारने पोस्ट खात्याची सेवा अत्यावश्यक असल्याने सुरूच ठेवली त्यामुळं सर्व पोस्टमन या लॉक डाउन काळामध्ये कार्यरत आहेत. नागरिकांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर, स्पीड पोस्ट, पार्सल वितरित करणे, वयस्क व्यक्तींचे पेंशन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे लोकांना घरपोच देणे इ. कामे पोस्टमन करत आहेत.

शिवाय अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जीवनावश्यक औषधे घरपोच करण्याचे काम देखील पोस्टमन करत आहेत. सध्या जिल्हाधिकारी यांनी जामखेड शहरातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन जामखेड शहर हॉट स्पॉट घोषित करून सील केले आहे. त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा, सरकारी आस्थापना, बँका इ. सर्वच बंद आहेत.

त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील बंद आहे. परंतु देशाच्या, राज्याच्या विविध भागातून पोस्टाद्वारे विविध पार्सले जामखेड मध्ये वितरित करण्यासाठी आली होती, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची औषधे होती. त्यामुळे ती त्वरित पोहोचविणे निकडीचे होते. अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी विशेष व्यवस्था करून त्वरित सदरची पार्सल जामखेड येथे पोहोच केली.

जामखेड सील केलेले असताना देखील तसेच पोस्ट ऑफिस बंद असताना देखील पोस्टमास्तर जगदिश पेनलेवाड तसेच पोस्टमन आनंद कात्रजकर, दादा धस यांनी जीवाची पर्वा न करता त्वरित सर्व पार्सल वितरित केली.

लॉक डाउन मुळे औषधे वेळेत पोहोच होणार नाहीत या चिंतेत असलेल्या रुग्णांना अचानक पोस्टमन औषधे घेऊन आल्याने अत्यंत आनंद झाला व त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी पोस्टमन व पोस्ट खात्याचे आभार मानले. जामखेड पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या या कामाबद्दल वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले, डाक निरीक्षक संदीप हदगल, कर्जतचे निरीक्षक चांदसाहेब नदाफ यांनी कौतुक केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment