कोरोनाच्या महासंकटावर निश्चितपणे मात करू – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती, दि. 15 : महाराष्ट्रभूमी ही शूरवीर आणि संतांची भूमी आहे. यापूर्वीच्या प्रत्येक संकटावर या भूमीने मात केली आहे. आपण सर्वजण धैर्य, संयम, शिस्तीचा अवलंब करून कोरोनाच्या महासंकटावरही निश्चितपणे मात करू, असा विश्वास पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी (60वा) वर्धापनदिन समारंभानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून आजचा हा ध्वजारोहण सोहळा जिल्ह्यात केवळ जिल्हा मुख्यालयात आणि तेही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक महापुरूष, संत, विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत अशा अनेकांचे मोठे योगदान आहे.

अमरावती जिल्हाही त्यात अग्रेसर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, शिक्षणमहर्षी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख अशा महापुरूषांची ही भूमी आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ लीळाचरित्र याच भूमीत लिहिला गेला.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरही विविध क्षेत्रांच्या विकासात जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. आज कोरोनाचे महासंकट देशावर व राज्यावर आले असताना आपण सर्वांनी भेदाभेद बाजूला ठेवून एकजुटीने त्याचा मुकाबला करणे आवश्यक आहे.

कोरोनाचे संकट सगळ्या जगासाठीच नवीन आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करताना अनेक नव्या अडचणी उभ्या राहत आहेत. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागत आहेत. मात्र, या भूमीने प्रत्येक संकटाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे.

भूकंप, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी अशा अनेक संकटांवर मात करून विकासाकडे वाटचाल केली आहे. या महासंकटातूनही आपण निश्चितपणे बाहेर पडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या काळात शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत.

अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा वर्कर, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार,  विविध अधिकारी, कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधासाठी लढत आहेत. जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या या सर्वांचे अभिनंदन पालकमंत्र्यांनी केले.

आपल्या या लढाईत अनेक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, खासगी, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आपापल्या परीने योगदान, सहभाग देत आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही मोठी मदत केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातून एक कोटी रूपयांहून अधिक निधी त्यात जमा झाला आहे. कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचे शासन, प्रशासन व जनता एकजुटीने लढत आहे, हे चित्र आशादायी आणि आपल्या विजयाची खात्री देणारे आहे, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा मुख्यालयाप्रमाणेच तालुका स्तरावरही कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे,  कोरोना चाचणी अहवाल लवकर मिळावेत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळावी, म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील लॅबही लवकरच कार्यान्वित होत आहे.

या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. गरजू व वंचित घटकांना रेशनच्या माध्यमातून धान्यपुरवठा केला जात आहे.

बाहेर जिल्ह्यात व परराज्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्यात परत आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कोटा येथील 72 विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याची परवानगी मिळाली.

त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, लवकरच ते अमरावतीत दाखल होतील. स्थलांतरित प्रवासी नागरिकांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तिथे राहणा-या नागरिकांनाही त्यांच्या गावी परत जाण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, या काळात अर्थव्यवस्था सुधारणेचे आव्हान आहे. त्यामुळे कोरोनामुक्त भागात काही उद्योग-व्यवसायांना परवानगी दिली आहे. विकासकामे थांबू नयेत म्हणून जलसंधारण, रस्ते व इतर कामे सुरू करण्यात आली आहेत.

ग्रामीण नागरिकांना त्यातून रोजगार मिळवून देण्यात येत आहे. या काळात शेतकरी बांधवांच्या शेतमाल खरेदीची प्रक्रिया नियमित ठेवणे, मुदतवाढ मिळणे यासाठीही प्रयत्न होत आहेत. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला मात्र, सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तो घेणे आवश्यक होते. कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणे हाच कोरोनाला हरवण्याचा उपाय आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये.

अनावश्यकपणे फिरू नये. बाहेरून घरी जाताना आपण कोरोना तर सोबत घेऊन जात नाही ना, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका.

सोशल डिस्टन्स पाळा. कुणालाही सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर तत्काळ तपासणी करून घ्या. कुठलीही माहिती लपवू नका. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही लढाई आपण नक्की जिंकू, असा विश्वास यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment